सावध चालवा गाडी... पुढे धोका आहे!

अनघा निकम-मगदूम


दोन वर्षांनंतर कोरोनाचे सावट काहीसे कमी झाल्यानंतर मोकळा श्वास घेण्यासाठी बाहेर पडलेल्या अनेक वाहनचालकांना मोठ्या आपत्तीचा सामना करावा लागला. यंदा मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहन अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांना, लहानग्यांना, महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे.


खरं तर कोरोनाच्या अत्यंत ताणाच्या सलग दोन वर्षांच्या कालखंडानंतर मोठ्या प्रमाणावर पर्यटक, चाकरमानी, नातेवाईक घराबाहेर पडले होते. तो उत्साह, आनंद प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर होता. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर सुट्टीच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढणार हेही अपेक्षित होते. त्यामुळे त्याप्रकारे महामार्ग दुरुस्ती, रखडलेली कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर होती. मात्र तसे झाले नाही. रत्नागिरी जिल्ह्यात तर राजापूर वगळता अन्य ठिकाणी महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणावर रखडले आहे. हीच परिस्थिती अनेक ठिकाणी अंतर्गत रस्त्यांचीही झाली आहे.


त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात झाले. अनेकांचे बळी गेले आहेत. हा आकडा गेल्या महिन्यात सतत वाढताच आहे. अशा वेळी प्रश्न एकच पडतो, या बळी गेलेल्या निष्पाप लोकांचा, अपघातामुळे उद्ध्वस्त झालेल्या अनेक कुटुंबातील सर्वसामान्य लोकांचा यात काय दोष आहे?


खरं तर वैयक्तिक आणि सामाजिक विकासामध्ये दळणवळण चांगले असणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. वाडी-वस्ती, गाव-तालुका, जिल्ह्यातून जाणारे, दोन राज्यांना जोडणारे रस्ते आपल्यासोबत तिथल्या लोकांचे नशीब सोबत घेऊन जात असतात. मार्ग विकासाचे असतात. वैयक्तिक विकासाचे असतात. हेच मार्ग शाळांपर्यंत पोहोचत असतात, हेच रस्ते बाजारपेठांना जोडतात, हेच रस्ते महानगरांपर्यंत जाऊन प्रगतीची नवी दालने उघडण्यास मदत करतात, हेच रस्ते आपल्या घरादारापर्यंत, नात्यागोत्यांपर्यंत, मित्र-परिवारापर्यंत घेऊन जातात, हेच रस्ते आजूबाजूला किती चांगलं आहे ते दाखवतात आणि म्हणूनच हे रस्ते समाज प्रगत करत असतात, समाज बांधत असतात. केवळ जमीन खोदली, त्यावर मातीचे, खडीचे थर घातले आणि डांबर ओतले की, रस्ते झाले इतकंच त्यात नसतं.


मात्र सध्या रस्त्याची कामे मिळवणे म्हणजे स्वविकासाचा नवा मार्ग आहे, असे समजले जाऊ लागले आहे. त्यात टक्केवारी, राजकारण आले आहे. मोठ्या प्रमाणावर मिळणाऱ्या पैशांमुळे त्यातील ठेकेदाराला मोठा मान मिळू लागला आहे. ठेका मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू झाला आहे आणि या आर्थिक व्यवहारांमुळेच रस्त्याचा दर्जा वारंवार घसरू लागला आहे. चांगले रस्ते देणे ही सत्तेवर असलेल्या सरकारची जबाबदारीच आहे. मात्र जबाबदारीपेक्षा आता ती कुणाचीतरी वैयक्तिक गरज झाल्याचे चित्र दिसत आहे.


बदललेल्या या परिस्थितीपुढे सर्वसामान्य माणसांच्या जीवाला कोणतीच किंमत राहिलेली नाही असेच दिसत आहे. सन २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणात येऊन मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा शुभारंभ केला होता. मात्र त्यानंतर रत्नागिरीतील चौपदरीकरणाचे काम इथल्या स्थानिक राजकारणामुळे रखडल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरीच्या शेजारीच या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थिती चांगली आहे. मात्र रत्नागिरीतील रस्ता हा स्थानिक राजकारणात अडकला आहे. त्यासाठी अगदी आंदोलनापासून स्वयंप्रेरणेतून रस्ते केले जात आहेत; परंतु महामार्गाबाबत असे करता येत नाही.


त्यामुळेच इथे महामार्गाचे काम रखडले असून अनेक ठिकाणी ते अपूर्णावस्थेत असल्याने अपघातांना निमंत्रण देत आहे. गेल्या महिनाभरात रत्नागिरीकर यामुळेच अनेक भीषण रस्ते अपघातांचे साक्षीदार झाले आहेत आणि ही परिस्थिती बदलण्याची वाट पाहत आहेत.

Comments
Add Comment

'कामगार कायदे संहिता' एक परिवर्तनकारी पाऊल

जयपूरमधील डिलिव्हरी सेवा असो. साणंदमधील तंत्रज्ञान सेवा असो अथवा गुवाहाटी येथील बांधकाम व्यवसाय असो. सर्व

नक्षलवादी आले मुख्य प्रवाहात...

वर्षानुवर्षे जंगलात फिरणारे अनेक नक्षलवादी आता मुख्य प्रवाहात परत येऊ इच्छितात आणि शांततापूर्ण जीवन जगू

'मालवणी'ला प्रतिष्ठा देणारा नाटककार

मालवणी नाटकांचा पाया रचणारे आणि या भाषेला जागतिक मंच देणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन झाले.

माहिती तंत्रज्ञान उजळवतेय शिक्षणक्षेत्र

इतर क्षेत्रांप्रमाणेच शिक्षणक्षेत्रातही माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून एक प्रकारची क्रांती अनुभवायला

प्रवासी नियमावली आली, पण सुरक्षिततेचे काय?

शयनयान बसमधल्या वाढत्या अपघातांमुळे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या अपघातात प्रवासी गंभीर जखमी होतात

कोकण रेल्वेचे फलाट अन् अपघातांची घंटा

१५ सप्टेंबर १९९० रोजी कोकण रेल्वेमार्गाच्या कामाची पायाभरणी रोहा येथे करण्यात आली. प्रत्यक्षात २६ जानेवारी