Thursday, September 18, 2025

बाबू

बाबू
डॉ. विजया वाड बाबू, माझा टुवाल दे.” “देतो दादा.” “बाबू, शेगडी फूक.” “देतो काकू.” “बाबू, येका वेळी किती काम करणार तू?” “चिडू नको गं म्हतारे.” त्याच्या आईचा जीव वर खाली झाला. बाबू गरीब, नाकर्ता. त्याला सांगकाम्या, ओ नाम्या म्हणून वापरतात; अशी खंत आईच्या मनात सलत होती काट्यासारखी. बाबूने न बोलता सारे केले. आई मनभर कळवळली. पण बाबूच्या बाबतीत त्या पलीकडे ती काही करू शकत नव्हती. हापिसात शिपाई असलेला बाबू ही तिची अगतिकता होती. सम्राट मोठा हापिसर, छबू क्लार्क बाई. सम्राटचा रुबाब मोठा. छबूचा नखरा खोटा. बाबू मात्र नेमस्त सेवक होता. सम्राट नि छबू आपापल्या पगारातले दोन दोन हजार खावटीचे देत. बाबू मात्र पुरा वीस हजार आईच्या हाती देई. बसचे पैसेसुद्धा आईकडे मागे. बाबूला सम्राट नि छबू कमी लेखीत. डोके नाही म्हणत. बाबू त्यावर कधी उलट बोलत नसे. ऐकून घेई. मग ते चेकाळत. एवढा सारा पगार आईच्या हाती देऊनही सम्राट नि छबूचा घरात मान! रुबाब! बाबू खालमान्या होता. मुका होई वेळेला. अपमान सहन करी. ऑफिसात मात्र वेळेवर जाई. फर्निचर मनाप्रमाणे साफ करी. फायलींचा जुडगा ज्यों को त्यों ठेवी. साहेब, क्लर्क सारे बाबूवर खूश होते. आजही तो वेळेवर ऑफिसात गेला. अर्धा तास आधी. कोपरान् कोपरा स्वच्छ करून ठेवला. मंजूची खुर्ची एकदा-दोनदा पुसली. खुर्ची तर पुसून कोरडी केली. पाच वेळा! समाधान होईपर्यंत. “अरे लाकडाची पण सालटी निघतील.” मंजू हसून म्हणाली. “तुम्ही बसणार! ते सिंहासन आहे’’. मंजूला बाबू म्हणाला. “वेडा कुठला” मंजूने गालावर चापटी मारली, तसा बाबू खूशम् खूश होऊन गेला. दिवसभराची टिप मिळाली… जणू काय! इतकासा स्पर्श पण बाबूला खूशम् खूश करणारा! मंजूला काही वाटत नसे. ती हेडक्लार्क बनेला खांद्यावर हात ठेवून डिफिकल्टी विचारी. फ्रेंड विचारे, सुखात्मे, यांना शेकहँड करी. पुरुष-स्त्री भेदभाव करायची नाही. मंजू बाबूला अतिशय आवडे. तिच्यासाठी नाक्यावरची भेल, आईस्क्रीम आणणे, तिचा डबा स्वच्छ, लख्ख करणे, तिची खुर्ची इतरांपेक्षा सर्वांपेक्षा छान ठेवणे. कित्ती कामे! बाबू मंजूचा सॉफ्ट कॉर्नर होता. बने बाई म्हणत, “शिपाई तो. बीकॉम तू! शोभत नाही.” “आय डोंट बिलिव्ह इन क्लास” मंजू टेचात बोलली. छबू नि सम्राट रिक्षा करून ऑफिसात जात. बाबू पायी पायी. एक दिवस छबू म्हणाली, “बाबू, तू आमच्याबरोबर रिक्षाने चल.” “नको नको. मजजवळ पैसे नसतात.” बाबू गडबडीने म्हणाला. “अरे पैशाचा प्रश्न येतो कुठे?” मी लिफ्ट देत्येय.” “मग नंतर म्हणाल.” बाबूने खुंटा बळकट केला. हलवून, हलवून. “अरे नाही. लिफ्टचे फुकट काम.” “वेळेवर पैशे मागाल.” बाबूचे पुन्हा घसीटे प्रश्न खुंटा! “नाही मागणार. शब्द दिला” छबू म्हणाली. “बघ हां!” “लिहून देऊ?” “नको.” छबू नि सम्राटसोबत रिक्षात बसला. पार्टी पार्टी करून दोघेच बोलत राहिली. बाबूला खिज-गणतीतही न धरता. बाबूला वाटलं, उगीच रिक्षात बसलो शरमिंधे झालो. फुकटचे! मध्येच ट्रॅफिक जॅम लागला. रिक्षा अडकून पडली. बाबू झटकिनी खाली उतरला. “मला उशीर होतो. मष्टरवर पयली सही माझी असते.” घाई घाई चालू लागला. गर्दीतून वाट काढीत. तेवढ्यात... रिक्षा वाट काढत पुढे आली. छबू नि सम्राट खिदळले. “बाबू, ए फुकट्या...ss” “बाबू, ए बावळ्या”... दिवसभरातला पहिला वहिला अपमान बाबूने मुकाट्याने गिळला नि तो चालत राहिला...
Comments
Add Comment