Tuesday, October 8, 2024
Homeसाप्ताहिककोलाजअशोकमामांची पंचाहत्तरी

अशोकमामांची पंचाहत्तरी

वैजयंती कुलकर्णी-आपटे

वयाच्या ७५ व्या वर्षी मुंबईच्या शिवाजी मदिरात व्हॅक्युम क्लीनर नाटकाचा प्रयोग त्याच उत्साहात, त्याच जोशात सादर करून प्रेक्षकांना मनमुराद हसवणारे अशोक सराफ, ऊर्फ अशोकमामा यांच्या मनोरंजन क्षेत्रातील कारकिर्दीलाही ५० वर्षे झाली आहेत. यानिमित्ताने त्यांचे विविध ठिकाणी सत्कार, मुलाखती, विविध प्रसार माध्यमांशी बोलणे हे सगळे चालू आहे. खरे तर मामा इतका वेळ आणि इतक्या मनमोकळेपणाने पहिल्यांदाच बोलले असावेत. मुळात स्वभाव मितभाषी, मोजकेच बोलणार, पण मुद्द्याचे बोलणार. बोलण्याचा वसा पत्नी निवेदिता हिच्याकडे दिला आहे, असे ते गमतीने म्हणतात. पण मनोरंजन क्षेत्रातल्या ५० वर्षांच्या काळात कधीही कुठल्याही वादात पडले नाहीत की त्यांच्याबद्दल कधी फिल्मी गॉसिप ऐकण्यात आले नाही. इतका सुस्वभावी हीरो, मराठीतला सुपर स्टार या चंदेरी दुनियेत विरळाच.

नाटक, चित्रपटात प्रेक्षकांना अखंड बडबड करून हसवणारे अशोकमामा, प्रत्यक्ष जीवनात मात्र खूप अबोल आहेत. ठरावीक मित्रमंडळींतच ते गप्पा मारताना खुलतात. ७५व्या वर्षीही त्यांच्या फिटनेसचे श्रेय मात्र पत्नी निवेदिता हिच्याकडे जाते. योग्य आहार आणि विहारचे पथ्य त्यांना पाळायला लावते. चित्रीकरणासाठी कितीही लवकर निघायचे असेल तरीही घरचा जेवणाचा दबा देते. रात्री आल्यावरही गरम भाकरी आणि भाजी असा त्यांचा आहार असतो. मुलगा अनिकेत मात्र या मनोरंजन क्षेत्रापासून दूर आहे. तो शेफ बनला आहे आणि कॅनडात नोकरी करतो आहे. अशोकमामांचं बालपण मुंबईतल्या चिखलवाडी इथे गेलं. त्यांचं शालेय शिक्षण मुंबईतील डी. जी. टी. विद्यालयात झाले. ज्येष्ठ दिग्दर्शक गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना नाटकाची आवड निर्माण झाली. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी ययाती आणि देवयानी नाटकातील विदूषकाची भूमिका केली. हे त्यांचं पहिलंच नाटक होतं. नंतर काही संगीत नाटकातूनही त्यांनी भूमिका केल्या. दादा कोंडके यांच्याबरोबर पांडू हवालदारमधली त्यांची भूमिका खूप गाजली आणि त्यांना खऱ्या अर्थाने विनोदी नट म्हणून मान्यता मिळवून दिली. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे याच्याबरोबर त्यांची विनोदी जोडी खूप गाजली. लक्ष्या, अशोकमामा, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे या चौकडीने अशी ही बनवा बनवी, धूम धडाका, दे दणादाण, गम्मत जंमत, नवरा माझा नवसाचा, बाळाचे बाप ब्रम्हचारी अशा अनेक धमाल विनोदी चित्रपटांनी जवळजवळ एक दशक मराठी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला. या काळाला मराठी सिनेसृष्टीतलं विनोदी चित्रपटाचे युग असेच म्हटले जाते. या विनोदी चित्रपटाच्या लाटेमुळे मराठी चित्रपटाचा दर्जा घसरला, अशी टीकाही त्यांच्यावर झाली.

पण, नंतर अशोकमामांनी आपली फक्त विनोदी अभिनेता ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. कळत नकळत, भस्म यांसारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. ‘वजीर’सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली, तर ‘चौकट राजा’मधील सहृदय गुणाची व्यक्तिरेखा त्यांनी साकारली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन’ व ‘एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर’पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले. आपली पत्नी निवेदिता जोशी-सराफ यांच्यासोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून ‘टन टना टन’ (मराठी) व काही हिंदी मालिका बनवल्या. मात्र ‘हम पांच’ या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. ‘हम पाच’ ही मालिका तब्बल दहा वर्षे चालू होती. मात्र मराठी मालिकेमध्ये त्यांनी आजपर्यंत काम केले नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी ‘दामाद’  या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘येस बॉस’, ‘जोडी नं.१’ हे अशोक सराफ अभिनीत काही हिंदी उल्लेखनीय चित्रपट केलेले आहेत. अशोक सराफ यांची खरी ओळख एक विनोदी अभिनेता म्हणून असली तरी मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या इतका हरहुन्नरी भूमिका साकारणारा कलाकार दुर्मीळच आहे. क्रूरकर्मा खलनायक ते उत्तम बंडू तुपे यांच्या भस्मवर आधारित चित्रपटातील भस्म्याच्या भूमिकेबरोबरच त्यांच्या विनोदी भूमिकाही प्रचंड लोकप्रिय झालेल्या आहेत. अशोक सराफ यांच्या नावावर प्रेक्षक आजही चित्रपट पाहायला जातात कारण प्रेक्षकांना पूर्णपणे ठाऊक असते की, त्यांचा चित्रपट पैसे वसूल करून देणारा असतो. मामांनी आतापर्यंत ३०० हून अधिक चित्रपटात काम केले. सिंघम हा अलीकडच्या काळातील त्यांचा गाजलेला चित्रपट. नाटकांमध्येही त्यांची हमीदाईची कोठी या नाटकातील नाना पाटेकर यांच्याबरोबरची भूमिका विशेष गाजली. एकांकिका स्पर्धेतही ते भाग घ्यायचे. अशोक सराफ यांना “अशोकमामा’’ या नावानेच अनेकजण ओळखतात, संबोधतात. मात्र, हे नाव कसे आणि कुणी दिले, हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. हे नाव आपल्याला कसे पडले, याचा उलगडा खुद्द अशोक सराफ यांनीच केला.

‘काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाच्या कॅमेरामनबरोबर त्यांची मुलगी येत असे. सेटवर आली की ती विचारत असे, हे कोण? त्या कॅमेरामनने सांगितले, हे अशोक सराफ… पण त्यांना तू अशोकमामा म्हणायचे आणि झालं, तिने अशोकमामा म्हणायला सुरुवात केली आणि त्यानंतर काही दिवसांतच सेटवर जो कोणी येईल, ते सर्वजण मला अशोकमामा म्हणूनच हाक मारू लागले.’ अशोकमामांचे नामकरण अशा पद्धतीने झाल्याचा किस्सा खुद्द अशोक सराफ यांनीच सांगितला. आता एखाद्या सुंदर मुलीने मामा म्हणून हाक मारल्यावर तितकाच हिरमोडही होतो, अशी मिश्कील टिप्पणी ते लगेच करून टाकतात. मला थेट ‘अशोक’ अशी हाक मारणारे तसे कमीच. ‘अशोकजी’ कुणी म्हटले, तर ते माझे मलाच झेपत नाही. तर ‘अशोक सर’ माझ्या प्रकृतीतच बसत नाही. सेटवर किंवा गर्दीच्या ठिकाणी चाहत्यांमधून येणाऱ्या ‘अशोकमामा’ या हाकेतील गोडवाच आपल्याला अधिक भावतो. त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीय त्यांना भाई नावाने ओळखतात. अशोक सराफ यांना अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळाले आहेत.

मराठी चित्रपट

आई नं. वन, आत्मविश्वास,  नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत,  भुताचा भाऊ, माझा पती करोडपती, एक उनाड दिवस, अफलातून, गोंधळात गोंधळ, अशी ही बनवाबनवी, एक डाव भुताचा, सगळीकडे बोंबाबोंब, आयत्या घरात घरोबा, कुंकू, बळीराजाचं राज्य येऊ दे, घनचक्कर,  तू सुखकर्ता, नवरा माझा नवसाचा, वजीर, अनपेक्षित, एकापेक्षा एक, चंगू मंगू, शुभमंगल सावधान, नवरा माझा ब्रम्हचारी, आमच्यासारखे आम्हीच, बाळाचे बाप ब्रम्हचारी, प्रेम करू या खुल्लम खुल्ला, गोष्ट धमाल नाम्याची, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, अरे संसार संसार, कळत नकळत, आपली माणसं, धूमधडाका, एक डाव धोबीपछाड, आयडियाची कल्पना.

हिंदी चित्रपट

कुछ तुम कहो कुछ हम कहें, बेटी नं. वन, कोयला, गुप्त, संगदिल सनम, जोरू का गुलाम, खुबसूरत, येस बॉस, करण अर्जुन, सिंघम.

नाटके

 हमीदाबाईची कोठी, अनधिकृत, मनोमीलन, हे राम कार्डिओग्राम, डार्लिंग डार्लिंग, सारखं छातीत दुखतंय.

दूरदर्शन मालिका

टन टना टन (ई. टीव्ही मराठी), हम पांच (झी वाहिनी), डोन्ट वरी, होजाएगा (हिंदी), छोटी बडी बाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -