Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेइंग्रजी माध्यमामील २५ टक्के विद्यार्थ्यांचा मराठी शाळेत प्रवेश

इंग्रजी माध्यमामील २५ टक्के विद्यार्थ्यांचा मराठी शाळेत प्रवेश

मराठी माध्यमाच्या शाळांना पुन्हा आले सुगीचे दिवस

प्रशांत जोशी

डोंबिवली : इंग्रजी माध्यम शाळा पसंतीमुळे मराठी माध्यम शाळा दुर्लक्षित झाल्या. जागतिकीकरण व सध्याची गरज तसेच मुलांना इंग्रजीमुळे अडचण निर्माण होऊ नये असा पालकांचा यामागे व्होरा होता. पण कोरोना महामारीमुळे आर्थिक डबघाई व बेकारीमुळे हा महागडा शैक्षणिक खर्च पालकांना अशक्य होत गेला. परिणामी पालकांनी पुन्हा कमी खर्चीक आणि दर्जेदार मराठी माध्यमातील सेमी इंग्रजी पर्याय शोधला. यामुळेच २५ टक्के पूर्वीच्या इंग्रजी माध्यम असलेल्या विद्यार्थ्यांनी मराठी शाळेत प्रवेश घेतला. या बदलामुळे मराठी माध्यम शाळा संस्था चालकांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत.

सामान्य पालकांनी इंग्रजी माध्यम शाळेला पसंती दिली आणि यामुळे मराठी माध्यमाच्या दर्जेदार शाळा विद्यार्थी मिळत नसल्याने ओस पडू लागल्या. पण दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीत आर्थिक परिस्थिती आणि बेकारीचे सावट सर्वसामान्यांवर आले. इंग्रजी माध्यमाच्या शाळेची फी भरणे आणि इतर खर्च डोईजड झाला.

विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडण्याची वेळ येऊ लागली. हा अनुभव पालकांना कोरोनाकाळात आल्याने आता शैक्षणिक फी चा विचार करून पालकांनी पुन्हा कमी फी असलेल्या खासगी शासकीय अनुदानित मराठी माध्यम शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे. परिणामी २५ टक्के इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी पुन्हा मराठी माध्यम शाळेत प्रवेश घेतल्याचे सिद्ध होत आहे. मराठी माध्यम शाळेत सेमी इंग्रजी माध्यम असल्याने कोणतीच अडचण येत नसल्याचे पालक सांगत आहेत.

कोरोनामुळे आता पालकांची मानसिकता बदलली आहे. आमच्याकडेही आता प्रवेशासाठी मुले येत असून आता शाळेच्या पटसंख्येत बदल दिसून येत आहे. भविष्यात आता मराठी शाळेला विद्यार्थी मिळत नाहीत, असे होणार नाही. -आशीर्वाद बोन्द्रे, कार्यवाह, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ

सेमी इंग्रजी माध्यमातून मुख्य विषय इंग्रजीतून शिकविले जात असून पुढील पदवी शिक्षण घेण्यात अडचण येत नाही. या संदर्भात अधिक प्रमाणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये भर देण्यात आला आहे. हे धोरण जाहीर झालेले आहे. त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी झाल्यानंतर मातृभाषेचे महत्त्व जास्त अधोरेखित होईल.
-प्र. भा. पिंगाळकर, पर्यवेक्षक – धनाजी नाना चौधरी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय डोंबिवली

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -