Sunday, July 21, 2024
Homeमहत्वाची बातमीजागतिक कीर्तीचे चित्रकार रवी परांजपे यांचे निधन

जागतिक कीर्तीचे चित्रकार रवी परांजपे यांचे निधन

पुणे (हिं.स.) : प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांचे अल्पशा आजाराने आज, शनिवारी दुपारी पुण्यातील खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे परांजपे यांना ३० मे रोजी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयोमानामुळे त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. परांजपे यांचे पार्थिव दुपारी मॉडेल कॉलनी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातारवणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी रंग-रेषांच्या चतुरस्र कलाकर्तृत्वाने अवघ्या विश्वाला मोहिनी घातली होती.

रवी परांजपे यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९३५ रोजी बेळगावात झाला. टाइम्स ऑफ इंडियामध्ये ते जाहिरातींसाठी इल्युजन काम करायचे. ते जगभरात बोध चित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. शिवाय जाहिरात आणि प्रकाशन या क्षेत्रात महत्त्वाची ठरणारी बोध चित्रकला, लावण्य योजना कला (डिझाईन), वास्तुबोध चित्रकला आणि स्वान्त सुखाय सृजनात्मक चित्रनिर्मिती अशा चित्रकलेच्या विविध अंगांना स्पर्श करीत गेली अनेक वर्षे परांजपे आपल्या वैविध्यपूर्ण चित्रनिर्मितीमध्ये त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचा, प्रज्ञेचा आणि अभ्यासपूर्ण चिंतनाचा प्रत्यय देत आले आहे.

ते पुण्यात १९९० ला स्थायिक झाले. तेथील मॉडेल कॉलनीमध्ये त्यांचा परांजपे स्टुडिओ आहे. ते एक उत्तम चित्रकार आहेतच, शिवाय एक चांगले कला समीक्षक, लेखक आहेत, आणि ह्या पलीकडे जाऊन ते सामाजिक जाणीव असलेले एक नागरिकही आहेत.

चित्रकलेची वैशिष्ट्ये

नवचित्रकलेच्या प्रवाहाच्या विरुद्ध ठामपणे उभे राहून त्यांनी अभिजात शैलीचा पाठपुरावा केला आहे. रवि परांजपे यांची शैली अनोखी आहे. सशक्त रेषा, सोपी आणि ओघवती मांडणी, त्रिमिती दाखवण्याचे वेगळे कसब, वेगवेगळे पोत कुंचल्यातून साकारण्याची ताकद त्यांच्या चित्रात दिसते. दृश्य वास्तवाला दिलेला भावनिक प्रतिसाद परांजपे यांनी निर्मिलेल्या कलाकृतींमधून दिसतो. त्यामुळे त्यांचे रंग, ते हाताळण्याची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्यांची शैली त्यांची, स्वतःची आहे. अनेक वर्षांच्या चित्रसाधनेतून त्यांनी ती विकसित केली आहे.

संशोधनपर लेखन

त्यांनी जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले आहे. त्यांचे ‘ब्रश मायलेज’ हे आत्मकथन तसेच परदेशी चित्रकारांचा परिचय करून देणारे ‘शिखरे रंग-रेषांची’ हे पुस्तक गाजले. ‘नीलधवल ध्वजाखाली’ हे लेख संग्रहावर आधारित पुस्तक प्रकाशित झाले आहे.

विविध पुरस्कारांना सन्मानित

परांजपे यांना १९९५ मध्ये ‘कम्युनिकेशन आर्ट्स गिल्ड हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांच्या ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला मिळालेला २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दयावती मोदी प्रतिष्ठानचा पुरस्कार तसेच ‘ब्रश मायलेज’ या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांना द बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे रूपधर हा चित्रकला क्षेत्रातील प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता.

प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन, पंडित जसराज यांसारख्या मान्यवरांकडे त्यांची चित्रे असून जगभरात त्यांच्या चित्रांचे चाहते आहेत. काही वर्षांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कलाकृती पाहिल्या होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -