Saturday, September 21, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखविश्वविक्रमाला गवसणी अन् हुलकावणीही...

विश्वविक्रमाला गवसणी अन् हुलकावणीही…

भारतीय नागरिक राजकारण आणि क्रिकेट या दोन्हीचे प्रचंड चाहते, नव्हे ते तर दिवाने. राजकारणाचा किंवा क्रिकेटशी त्यांचा कोणताही थेट (प्रत्यक्ष) संबंध वा सहभाग नसला तरी या दोन्ही बाबतीत आपली मते हिरीरीने मांडताना सर्व शौकिन दिसतात. कधी कधी ते इतके भावनिक असतात की, आपल्या मनासारखे काही घडले नाही, तर त्यांचा पुरता हिरमोड होऊन काही लोक जीवाचे बरेवाईट करून घेतात किंवा अन्य मार्गाने आपली निराशा व्यक्त करतात. हे सांगण्याचे तात्पर्य असे की, आपला सर्वांचा आवडता खेळ क्रिकेटमध्ये अतिवेगवान टी-२०च्या स्वरूपातील सलग १२ सामने जिंकून सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्वविक्रम करण्यासाठी केवळ एक सामना जिंकणे भारतासाठी गरजेचे होते. राजधानी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी झाला व तो सामना जिंकला असता, तर आपण टी-२० फॉरमॅटमध्ये सलग १३ सामने जिंकून विश्वविक्रम केला असता. पण अगदी हातातोंडाशी आलेला विक्रम आपल्याच कर्माने कसा हातातून निसटू द्यायचा याचे अलीकडचे उत्तम उदाहरण म्हणजे हा सामना होय.

या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी धडाकेबाज फटकेबाजी करत २११ धावा केल्या होत्या. त्यामुळे हा सामना भारत जिंकेल, असेच वाटत होते. पण कर्णधार रिषभ पंत याला चांगले नेतृत्वगुण दाखविता आले नाहीत. कारण मोक्याच्या क्षणी रिषभ पंतने चुकीचे निर्णय घेतले आणि त्यामुळेच भारताला पराभवाचा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल, ज्याने नुकत्याच झालेल्या ‘आयपीएल’च्या १५व्या हंगामात सर्वाधिक बळी मिळविण्याचा विक्रम केला होता, तो चांगली व टिच्चून गोलंदाजी करत होता. सामन्याच्या आठव्या षटकात अचूक गोलंदाजी करत चहलने फक्त सहा धावा दिल्या होत्या. त्यावेळी चहल हा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर चांगले दडपण आणत होता. पण त्यानंतर पंतने अचानक चहलला गोलंदाजी करण्यापासून थांबवले. चहलला जर त्यावेळी गोलंदाजी करण्याची संधी दिली असती, तर दक्षिण आफ्रिकेवरचे दडपण वाढत गेले असते आणि त्याचा परिणाम सामन्यावर होऊ शकला असता. त्याचबरोबर अखेरच्या षटकांमध्ये फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर जास्त धावा जातात, हेदेखील सर्वांना माहिती आहे. तरीही जेव्हा संघाची दोन षटके शिल्लक होती तेव्हा चहलची दोन षटके बाकी होती. याचा अर्थ पंतने आठव्या षटकानंतर चहलच्या हाती थेट अखेरच्या षटकातच चेंडू दिला आणि त्याचे एक षटक वाया घालवले. त्याचबरोबर पंतने यावेळी चुकीच्या वेळी हार्दिक पंड्या याला गोलंदाजीला आणले. त्याच्या एका षटकात तीन षटकार बसले आणि त्यानंतर भारतावरचे दडपण वाढले. पंड्या हा चांगल्या फॉर्मात आहे, आयपीएलमध्येही त्याने अचूक आणि भेदक गोलंदाजी केली होती. पण तरीही त्याच्या गोलंदाजीचा योग्य वापर यावेळी पंतला करता आला नाही आणि त्यामुळेच भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ७ विकेटनी पराभव झाला आणि पंतच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला.

भारताने प्रथम फलंदाजी करत ४ बाद २११ धावा केल्या होत्या. द. आफ्रिकेने विजयाचे हे कठीण असे हे लक्ष्य १९.१ षटकात ३ विकेटच्या बदल्यात सहज पार केले. इतकी चांगली धावसंख्या उभी करूनही भारताचा पराभव झाला. या आधी भारताविरुद्ध कधीच कोणत्याही संघाने २००पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करून विजय मिळविला नव्हता. त्यातच विश्वविक्रमासाठीचा हा सामना नेमका मायदेशात झाला व आपले सर्व खेळाडू चांगल्या फॉर्मात आहेत. सामन्याची सुरुवातही आपल्या फलंदाजांनी धडाकेबाज केली आणि दक्षिण आफ्रिकेपुढे २१२ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. पण त्यानंतर रिषभ पंतला गोलंदाजांना योग्य प्रकारे हाताळता आले नाही आणि सारं काही जुळून आलेले असताना क्षुल्लक चुकांमुळे आपल्याला मानहानिकारक पराभव पत्करावा लागला आणि विश्वविक्रम करण्याची नामी संधीही गमवावी लागली आणि सर्व क्रिकेट शौकिनांची पार निराशा झाली. पण त्याच वेळी आतापर्यंत अवघ्या क्रिकेट विश्वात जी गोष्ट कोणत्याही संघाला जमलेली नव्हती, ती पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाने करून दाखवली आहे. मुंबईने रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंडचा ७२५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखदार प्रवेश केला. मुंबईचा हा विजय प्रथम श्रेणी क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय आहे. हा क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा विजय असून आतापर्यंत कोणत्याही संघाला एवढा मोठा विजय मिळवता आलेला नाही. यापूर्वी हा विश्वविक्रम न्यू साऊथ वेल्स संघाच्या नावावर होता. पण एवढा मोठा विजय त्यांना मिळवता आलेला नव्हता. न्यू साऊथ वेल्सच्या संघाने १९३० साली क्वीन्सलँडच्या संघावर ६८५ धावांनी विजय साकारला होता. त्यानंतर हा विश्वविक्रम कोणत्याही संघाला मोडता आला नव्हता. आता तब्बल ९२ वर्षांनंतर मुंबईने हा विश्वविक्रम मोडीत काढला आणि नवा विश्वविक्रम रचला आहे. या विक्रमात सुवेद परकारचे (२५२) द्विशतक व सर्फराज खानच्या १५३ धावांचे शतक याचा समावेश आहे.

मुंबईने पहिला डाव ६४७/८ धावांवर घोषित केला. त्यांनतर मुंबईने उत्तराखंडसमोर ७९४ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले. मात्र उत्तराखंडच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली आणि लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण संघ अवघ्या ६९ धावांत गारद झाला. ४१ रणजी करंडक जिंकलेला मुंबई संघ हा भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यामुळे आता या वर्षी अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ यापुढेही नेत्रदीपक कामगिरी करेल यावर शिक्कामोर्तब झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशा प्रकारे क्रिकेट शौकिनांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या या दिवशी मुंबईच्या रणजी संघाने चिकाटी, आत्मविश्वास, लढाऊ बाणा आणि सांघिकतेच्या बळावर विश्वविक्रमाला गवसणी घातली आणि त्याच वेळी मात्र चांगल्या भरात असलेल्या आपल्या भारतीय क्रिकेट संघाने ढिसाळ क्षेत्ररक्षण, अपरिपक्वता याचे दर्शन घडवित विश्वविक्रमाची नामी संधी गमावल्याने ते टीकेचे धनी ठरले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -