मुंबई : कोल्हापूरच्या पैलवानाने असा डाव टाकला की कळालाच नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, ते आमचा गुडग्यात आहे म्हणत होते, पण आता ते गुडघ्यावर बसले आहेत, कसा विजय मिळवला हे त्यांना अजूनही कळालेले नाही. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले. शरद पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. देवेंद्रजी प्रेमळ आहेत, त्यांनी एक विश्वास तयार केल्याचे ते म्हणाले.
राज्यसभेप्रमाणेच आम्हाला विधान परिषदेसाठीही मतदान होईल. अनेकजण गुप्तपणे फडणवीस यांना हात धरून सांगत होते. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीमध्येही आम्ही जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला विधान परिषदेसाठी प्रस्ताव दिला. अर्ज माघारीसाठी दोन दिवस उरले आहेत, शहाणे आणि समजूतदार असाल तर आताच अर्ज मागे घ्या आणि निवडणूक बिनविरोध करा, अन्यथा आम्ही लढणारच आहोत आणि जिंकणारही आहोत, असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी दिला.