मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.
भाजपाच्या विजयाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, “हो, मला नक्कीच खूप आनंद झाला आहे. “अब देवेंद्र अकेला नही है, ना कभी था, उनके साथ पुरी कायनात है” अशा शब्दांत त्यांनी आपल्या पतीचे कौतुक केले आहे. “जो विकासाचे राजकारण करेन तोच दुनियात पुढे जाईल, टोमणेबाजीचे राजकारण करणारे मागे राहतील,” असेही त्या म्हणाल्या.
भाजपाने रडीचा डाव खेळला यावरुन झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “जी लोक सोबत आली आहेत, ती प्रेमाने सोबत आली आहेत. सरकार कसे चालते हे त्यांना कळाले आहे. भाजपा जे काही करत आहे, ते कर्तुत्वाच्या जोरावर करत आहे. रडीचा डाव खेळण्यासाठी ते महाविकास आघाडी नाही. भाजपा भाजपा आहे. ती कर्तुत्वाचा डाव खेळते.” यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत देखील भाष्य केले आहे.
राज्यसभा निवडणुकीत आपला विजय झाल्याने विधान परिषदेतही विजय मिळेल यात काहीच दुमत नाही, असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या प्रजेसाठी किती योग्य आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी कोणी काही बोलत नव्हते. पण आता प्रत्येक नागरिक बोलत आहे. त्यामुळे आता मला बोलायची गरज नाही.
या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस किंग मेकर ठरले आहेत. याबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली. यामध्ये विजयी झालेले पियुष गोयल, धनंजय महाडिक आणि अनिल बोंडे या सर्वांना शुभेच्छा देतो. हा विजय खूपच सुंदर आहे. सत्याचा विजय झालेला आहे. सत्याच्या बाजूने सगळेजण आहेत, याचा मला आनंद आहे.