मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर आज मुंबईतील पक्ष कार्यालयात भाजपने विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सरकारवर जोरदार टीका केली. फडणवीस यांनी म्हटले की, आपला विजय हा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित केला पाहिजे. त्यांच्या मतदानामुळे आमची तिसरी जागा निवडून आली. आपण जिंकल्यानंतर अनेकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहेत काही पिसाळले असल्याचा हल्लाबोल फडणवीसांनी केला. निवडणुकीत जे विजयी होतात त्यांनी आनंद साजरा करायचा असतो, त्यांनी उन्माद करायचा नसतो असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केले.
या पराभवानंतर आता मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने अंतर्मुख व्हायला हवे असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. राज्यातील विकास थांबला आहे. आमच्या काळातले सर्व प्रकल्प थांबवून राज्याचे अतोनात नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. विमा कंपन्यांना मोठा फायदा होत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. किमान दोन कामे राज्य सरकारने दाखवावी असे आव्हानही फडणवीस यांनी दिले.
फडणवीस यांनी आगामी विधान परिषदेसाठी भाजप सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विधान परिषदेची जागा आपण लढवत आहोत निवडणूक सोपी नसल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेपेक्षाही अधिक लोकांची सदसद्बुद्धि जागृत असेल असा दावा त्यांनी केला.