मुरूड (वार्ताहर) : रोहा तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील असलेली गावे गोपाळवट, फणसवाडी, वाघीरपट्टी, मसाडी, कांटी, केळघर, वांडरखोंडा, साटलेवाडी, आराळी, खडकी, वांदरखोंड असा सुमारे दहा ते बारा गावांचा वीज पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून खंडित झाल्याने वीज ग्राहक पुरते हैराण झाले आहेत. दरवर्षी रोहा महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने अशा प्रकारे अनेक दिवस वीज प्रवाह खंडित होत असतो, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
गुरुवार ०९ जून रोजी या गावांचा वीज पुरवठा खंडित झाला असुन, गेले अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरी विज प्रवाह सुरू झाला नसल्याने या गावातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. अनेक वेळा रोहा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन केला असता, एक तासात दोन तासात लाईट येईल असे सांगत असून अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरी वीजेचा पत्ता नाही, अशी माहिती फणसवाडीचे ग्रामस्थ गोविंद हिरवे यांनी दिली.
ही गावे अत्यंत दुर्गम डोंगर भागात वसलेले असल्याने महावितरण या गावांच्या वीज पुरवठ्याकडे नेहमीच दक्ष करीत असल्याने गावांतील ग्रामस्थांना नेहमीच अंधारात रहावे लागते. याकडे तातडीने लक्ष देऊन या ठिकाणच्या गावांचा नेहमीच विज पुरवठा खंडीत होत असलेला सुरळीत करावा, अशी या ठिकाणच्या ग्रामस्थांची मागणी आहे.