पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १४ जून रोजी देहू येथे जगतगुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या दौऱ्याची प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंदिर ट्रस्ट तर्फे विशेष डिझाइनची पगडी घालण्यात येणार आहे. याकरिता पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांना देहू संस्थांन विश्वस्तांनी तुकाराम पगडी आणि उपरणे तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. मुरुडकर यांच्याकडून विशेष अशी तुकाराम पगडी तयार करण्यात आली आहे.
देहू संस्थांचे नितिन महाराज काळोखे आणि आचार्य भोसले यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास तुकाराम पगडी आणि उपरणे बनविण्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांनी एक रेगूलर तुकाराम महाराज पगडी आणि एक डिझायनर तुकाराम पगडी आणि उपरणे बनवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी तयार होणारी स्पेशल तुकाराम पगडी ही भपकेबाज नसून पारंपरिक राहणार आहे. या मागचा आमचा उद्देशही तसाच आहे. देशाच्या पंतप्रधानांना आज तुकाराम महाराजांच्या विचारांची गरज आहे.
त्यादृष्टीने आम्ही ज्या पद्धतीने तुकाराम महाराज जशी पगडी घालायचे तशी पगडी आम्ही बनवत आहोत. या साठी त्या काळी जे कापड ही पगडी बनविण्यासाठी वापरले जात होते, त्याच पद्धतीचे कापड आम्ही वापरणार आहोत. ही पगडी वैशिष्ट्यपूर्ण आहे, ती घातल्यावर गंध आणि तीला वेगळी लावण्याची गरज पडणार नाही, असे यावेळी मुरूडकर यांनी सांगितले.