ठाणे (हिं.स.) ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. २३ जून पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.
कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना मनाई आदेश लागू करण्यात आला आहे, असे या आदेशात नमूद केले आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी कळविले आहे.