Tuesday, April 22, 2025
Homeमहत्वाची बातमीशाळा १३ जूनलाच सुरू होणार

शाळा १३ जूनलाच सुरू होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या रुग्णांच्या दिवसागणिक वाढणाऱ्या आकडेवारीमुळे पुन्हा एकदा मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वात आधी चिंता सतावतेय ती म्हणजे पालकवर्गाला. पण मुंबई महानगरपालिकेने मात्र शाळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत ठरल्याप्रमाणे येत्या १३ जून पासून सुरु होतील असे स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेत पालिका शाळा सुरु करण्यात येतील, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाची पहिली लाट थोपवण्यात यश आल्यानंतर शाळा सुरु करण्यात आल्या. मात्र त्यानंतर कोरोनाची दुसरी व तिसरी लाट आल्याने शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. सध्या शाळांना सुट्टी असून दरवर्षीप्रमाणे १३ जून रोजी मुंबईतील पालिका शाळा सुरु केल्या जातात. मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शाळा सुरु होणार का यावर प्रश्नचिन्ह होते. याबाबत पालकांमध्ये भीती व संभ्रमावस्था आहे. मात्र कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर येत्या १३ जूनपासून शाळा नियमितपणे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरोना नियम व खबरदारी घेऊन शाळा सुरु केल्या जाणार आहेत.

महापालिका शाळांत येणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत पालिकेच्या ५०० शालेय इमारतींचे सॅनिटायझेशन पुढील ६ दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या गेटवर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार असून प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत मास्क देण्यात येणार असल्याचे कंकाळ यांनी सांगितले. शाळांमध्ये ऑक्सिमीटर, सॅनिटायझरची व्यवस्था, विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेच्या १,१४७ शाळा असून तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका वर्गात ४० ते ५० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे हे शिक्षण विभागासमोर मोठे चॅलेंज आहे. परंतु शिक्षण विभागाने याबाबतही योग्य ती दक्षता घेतली असून प्रत्येक वर्गात सोशल डिस्टन्सिंगचे नियम कशा प्रकारे पाळावेत याबाबत योग्य ती काळजी घेतली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत १३ जूनपासून शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही कोरोनाविरोधी लसीकरणासाठी प्राधान्याने कॅम्प लावणार आहोत. कोरोना विरोधी लसीकरणामध्ये १२ ते १४ वयोगटाच्या विद्यार्थ्यांमध्ये लसीकरण कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळेच या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कॅम्प राबवत लसीकरण मोहीम राबवणार आहोत अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -