मुंबई, (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली आहे. गुरुवारी सत्र न्यायालयाने दोन्ही नेत्यांना मतदान करण्याची परवानगी नाकारली होती. तोच निर्णय वरिष्ठ न्यायालयाने आजही कायम ठेवला.
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सहा जागांवर सात उमेदवार रिंगणात आहेत. सहावा उमेदवार विजयी करण्यासाठी आवश्यक असलेली मते कुठल्याच राजकीय पक्षांकडे नसल्याने एक-एक मत अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी लहान पक्ष आणि अपक्षांचीही मदत घेण्यात येत आहे.
मात्र, सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन आमदार हे अटकेत आहेत. त्यामुळे या आमदारांनाही निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी, यासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र, सत्र न्यायालयाने मतदानाची परवानगी नाकारली. त्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात तातडीने आव्हान देण्यात आले. त्यावर आज सुनावणी झाली. त्यात उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत मतदान करण्याची परवानगी नाकारली.
ही याचिका सुनावणीसाठी योग्यच नाही असा दावा सरकारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या महाधिवक्ता अनिल सिंग यांनी न्यायालयात केला. त्यावर नवाब मलिकांच्या वकिलांनी युक्तीवाद करताना म्हटले की, घटनात्मक अधिकार आहे तोच आम्ही मागतोय. आता मलिक कोठडीत नसून रुग्णालयात आहेत. त्यामुळे त्यांना फक्त काही वेळ दिला तर त्यांना त्यांचा घटनात्मक अधिकार वापरता येईल.
मलिक यांच्यावतीने युक्तीवादाकरता ज्येष्ठ वकील अमित देसाई, तर अनिल देशमुख यांच्यावतीने युक्तीवादाकरता आबाद पोंडा यांनी युक्तीवाद केला. तर सरकारी पक्षाची बाजू महाधिवक्ता अनिल सिंग यांनी मांडली.