Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीमान्सून इलो रे इलो...

मान्सून इलो रे इलो…

सिंधुदुर्गात सरीवर सर, भात पेरणीला वेग

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सुमारे दहा दिवसांपासून प्रतिकूल वातावरणामुळे आगेकूच करू न शकलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाने अखेर दक्षिण कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी त्याचा प्रवेश जाहीर केला. गोव्याची हद्द ओलांडून मोसमी पाऊस दक्षिण कोकणातील वेंगुर्ल्यापर्यंत दाखल झाला आहे. त्यामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, मृग नक्षत्राची सुरुवात वरुण राजाने आस्ते कदम टाकले असले तरी गुरूवारी मध्यरात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. दुपार नंतर सरींवर सरी कोसळत होत्या. पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला असून शुक्रवारी जिल्हाभरात भात पेरणीला वेग आला आहे.

अखेर मान्सूनची प्रतिक्षा संपली असून नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मागच्या वर्षी मान्सून ७ जूनला तळकोकणात दाखल झाला होता. तर यावर्षी महाराष्ट्रात यायला मान्सूनला तीन दिवस उशीर झाला आहे. हवामान विभागाने केलेल्या अंदाजानुसार कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. कर्नाटकमध्ये अडकलेली मान्सूनची गाडी पुढे सरकारली आणि अखेर शुक्रवारी मान्सून कोकणात दाखल झाला. नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, तसेच संपूर्ण गोवा, कोकणचा काही भाग आणि कर्नाटकच्या काही भागात दाखल झाला आहे.

मोसमी पावसाने यंदा सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस आधीच म्हणजे २९ मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला होता. या काळात अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत असल्याने आठवड्याच्या कालावधीतच महाराष्ट्रात मोसमी पावसाचा प्रवेश होण्याबाबत अंदाज देण्यात आला होता. मात्र, वाऱ्यांचा वेग कमी होऊन मोसमी पावसाच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला. ३१ मे रोजी कर्नाटकच्या कारवारपर्यंत आणि गोव्यापासून काही अंतरावर मोसमी पाऊस पोहोचला. त्यानंतर त्याची कोणतीही प्रगती झाली नव्हती. अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाचा प्रवास गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून थांबलेला होता. मात्र, प्रवासासाठी पोषक वातावरण तयार झाले असून लवकरच मोसमी पावसाचा कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश होईल, असे हवामान विभागाने गुरुवारी (९ जून) जाहीर केले होते. त्यानुसार हा प्रवेश झाला आहे.

समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे सध्या महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागांतही पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.मोसमी पावसाने कर्नाटकचा बहुतांशी भाग व्यापून गोव्यात प्रवेश केला. त्यानंतर तो दक्षिण कोकणाची वेस ओलांडून वेंगुर्ल्यापर्यंत पोहोचला आहे. त्याच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.गुरुवारी रात्री कोसळलेल्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी सह्याद्री पट्ट्यात शेतीच्या कामांनी वेग घेतला होता.

मुंबईसह उपनगरात पाऊस

दरम्यान, दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. तर ठाणे, गोरेगाव, कल्याण, भिवंडीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सरींमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. भिवंडी शहरासह ग्रामीण भागामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू झाल्याने परिसरात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -