Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमीसुक्या मासळीने खाल्ला भाव;  दरात ४० टक्क्यांनी वाढ

सुक्या मासळीने खाल्ला भाव;  दरात ४० टक्क्यांनी वाढ

आवक कमी; मागणीत वाढ

वाकटीचा दर ७०० रुपये किलो

सुधागड-पाली (वार्ताहर) : पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात अगोटीची खरेदी जोरात आहे. त्यामुळे सुक्या मासळीची मागणी वाढली आहे. परिणामी मागणी अधिक व आवक कमी असल्याने मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात सुक्या मासळीचे भाव तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी वधारले आहेत.

गेल्या महिन्यात ४०० रुपये किलोने मिळणारी मोठी वाकटी आता तब्बल ७०० रुपये किलोने मिळत आहे. सोडे, माकूल अशा सुक्या मासळीचे भाव तर खूप वाढले आहेत.

१ जूनपासून समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. परिणामी पावसाळ्यात मांसाहारी खाणा-यांना सुक्या मासळीचा उत्तम पर्याय व आधार असतो. मात्र कमी प्रमाणात मासे मिळणे व मासळीची आवक कमी यामुळे सुक्या मासळीचे भाव वधारले आहेत.

जिल्ह्यातील समुद्रात अगदी कमी प्रमाणात मासळी सापडते. सापडलेली ताजी मासळी विकण्यावर मच्छिमारांचा कल असतो. मासळी आधीच कमी त्यात सुकविण्यासाठी कशी उरणार त्यामुळे मासळी फार कमी जण सुकवत आहेत, असे पालीतील मासळी विक्रेत्या गौरी मनोरे यांनी सांगितले. डिझेलचे व मजुरीच्या वाढलेल्या दरामुळेसुद्धा सुक्या मासळीचे भाव वाढले आहेत.

मासळीची आवक कमी झाल्याने सुकवलेले सुरमई व पापलेट, माकुल हे महागातले मासे बाजारातून गायब झाले आहेत. पावसाळ्यात समुद्रातील मासळी मिळत नसल्याने सुकी मासळीचा उत्तम पर्याय असतो. त्यामुळे किमत वाढली तरी सुकी मासळी काही प्रमाणात खरेदी केली आहे, असे खवय्ये किरण खंडागळे यांनी सांगितले. तसेच मागील महिन्याच्या तुलनेत आता सुक्या मासळीचे भाव खूप वाढले आहेत. अगोटी असल्याने खवय्ये सुकी मासळी खरेदी करतात, असे मासेविक्रेते सरफराज पानसरे म्हणाले.

सुकी मासळी भाव प्रतिकिलो

साधे सोडे – आता – १८०० रुपये, मागील महिन्यात १६०० रुपये

उच्च दर्जाचे सोडे – आता – २२०० रुपये, मागील महिन्यात – २००० रुपये

अंबाडी सुकट – आत्ता – ६५० रुपये, मागील महिन्यात – ५०० रुपये

सुकट – आत्ता – ३०० रुपये, मागील महिन्यात – २५० रुपये

मासे सुकट (खारे) – आत्ता – ५०० रुपये, मागील महिन्यात – ४०० रुपये

बोंबील – आत्ता – ७०० ते ७५० रुपये, मागील महिन्यात ६०० ते ७००

माकुल – आत्ता – ७०० रुपये, मागील महिन्यात – ६०० रुपये

वाकटी मोठी – आत्ता – ७०० रुपये, मागील महिन्यात – ४०० रुपये

वाकटी छोटी – आता ४०० रुपये, मागील महिन्यात ३०० रुपये.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -