Saturday, October 25, 2025
Happy Diwali

राज्यसभेचे ४१ खासदार बिनविरोध विजयी

राज्यसभेचे ४१ खासदार बिनविरोध विजयी

नवी दिल्ली (हिं.स.) : देशातील १५ राज्यांमधल्या राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यापैकी ११ राज्यांमधील ४१ जागांवरील निवडणूक बिनविरोध झालीय. बिनविरोध विजयी होणाऱ्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, पी. चिदंबरम आणि राजीव शुक्ला यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि हरियाणा या ४ राज्यातील १६ जागांसाठी मतदान घेण्यात आले.

उत्तर प्रदेशातून ११ खासदार विजयी झाले असून यापैकी ८ जण भाजपचे आहेत. भाजपच्या उमेदवारांमध्ये लक्ष्मीकांत वाजपेयी, डॉ.राधामोहनदास अग्रवाल, महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्षा दर्शना सिंह, संगीता यादव, बाबुराम निषाद, राज्यसभा सदस्य सुरेंद्र कुमार नागर, डॉ.के. लक्ष्मण आणि माजी खासदार मिथिलेश कुमार यांचा समावेश आहे. तर समाजवादी पार्टी आघाडीकडून, जावेद अली, आरएलडीचे जयंत चौधरी आणि सपाला पाठिंबा असलेले कपिल सिब्बल यांचा समावेश आहे. बिहारमधून ५ जागांवर मतदान न करता खासदार निवडून आले आहेत. यामध्ये भाजपाला दोन, आरजेडीला दोन आणि जेडीयूला एक जागा देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील ४ जागांवर निवडून आलेले सर्व खासदार वायएसआर काँग्रेसचे आहेत.

तामिळनाडूतून ६ खासदार मतदानाशिवाय निवडून आले आहेत. तेलंगणात २ जागांवर टीआरएसचे बी. पार्थसारधी रेड्डी आणि डी. दामोदर राव. छत्तीसगडमध्ये दोन्ही जागांवर काँग्रेसचे राजीव शुक्ला आणि रंजीत रंजन बिनविरोध निवडून आले. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला दोन्ही जागा मिळाल्या. येथून बलबीर सिंह सीचेवाल आणि विक्रमजीत सिंह साहनी राज्यसभेत पोहोचले. झारखंडमध्ये महुआ माझी एक जागा आणि एक जागा भाजपच्या आदित्य साहू यांच्या बाजूने गेली. उत्तराखंडमधील भाजपाच्या उमेदवार डॉ. कल्पना सैनी राज्यसभेत पोहोचल्या आहेत. मध्य प्रदेशात भाजपला २ तर काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. कविता पाटीदार आणि सुमित्रा वाल्मिकी भाजपाकडून तर विवेक तनखा काँग्रेसकडून निवडून आले. तर, ओडिशातील तीनही जागा बीजेडीच्या बाजूने गेल्या आहेत.

Comments
Add Comment