मुंबई : राज्यात आज २८१३ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर एका कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. २८१३ नव्या रुग्णांपैकी १,७०२ रूग्ण एकट्या मुंबईतील असल्याने येथील नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे.
राज्यात आज रोजी एकूण ११५७१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यात मुंबईमध्ये सर्वाधिक ७,९९८ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर ठाण्यात १,९८४ इतके सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांसह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अडीच हजारांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद केली जात आहे. त्यात आज या आकडेवारीने नवा टप्पा पार केला आहे.
आज १०४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण ७७,४२,१९० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९८ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्का एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,११,९६,७२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,०१,६२८ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.