सावित्रीच्या लेकी बारावीत सरस

Share

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. गेल्या आठ-दहा वर्षांप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारल्याचे दिसून आले, ही समाधानाची बाब आहे. या वर्षी ९५.३५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. राज्याच्या ग्रामीण भागात एसटीचा संप, कोरोनाचे संकट असताना ६,५३,२७६ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातून ६,२२,९०५ मुली उत्तीर्ण झाल्या, तर यंदा उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण ९३.२९ टक्के आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा २.०६ टक्के अधिक मुली यंदा उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आज सर्वच क्षेत्रांत महिलांची होत असलेली प्रगती ठळकपणे दिसून येत असताना, बारावीच्या परीक्षेत पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे, ही विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे लक्ष वेधून घेणारी उल्लेखनीय घटना आहे. स्त्री शिक्षणाची कवाडे १७४ वर्षांपूर्वी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी खुली केली, त्याची आज पुन्हा एकदा आठवण झाली.

१ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून मुलींची प्रथम शाळा सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली होती. त्यात अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा भागवत, माधवी थत्ते, सोनू पवार, जनी कार्डिले या चार ब्राह्मण, एक मराठा व एका धनगर जातीच्या मुलींना प्रवेश दिला होता. आज लाखो मुली विविध क्षेत्रांतील परीक्षेच्या अग्निदिव्यातून सहज पुढे जाताना दिसत आहेत. घरातील एक महिला साक्षर असेल, तर कुटुंब साक्षर बनते, हा गेल्या पन्नास वर्षांत झालेला बदल आहे. विद्येच्या क्षेत्रात मुलींचा टक्का वाढतो, हा राज्याचा सर्वार्थाने सुधारणेचा केंद्रबिंदू ठरत आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या सर्वच परीक्षांमधला विद्यार्थीनींचा उत्तीर्णतेचा टक्का वाढतो आहे, ही सुखद वाटणारी घटना सध्या महाराष्ट्रात घडत आहे. आपल्याकडे समाजातील स्त्रीची भूमिका आदर्श गृहिणी, आदर्श पत्नी, माता ही आहे. पण या व्यतिरिक्त तिला काय व्हावेसे वाटते याला फारसे महत्त्व दिलेच जात नव्हते. निसर्गनियमानुसार मुली वयात येतात, प्रेमात पडतात आणि आपला जीवनसाथी निवडतात, अथवा वडील मंडळी त्यांचा जीवनसाथी शोधतात. पालक म्हणून ते मुलींच्या लग्नाची काळजी करत असतात; परंतु हे जे घडते याबरोबरच अन्य काही आपण घडवावे, असे प्रत्येक मुलीला वाटत असते. मुलींना काय व्हावेसे वाटते? याचा शोध घेताना सामाजिक संस्कारांचा त्या इच्छेला बसणारा पायबंद आपल्याकडील शिक्षकांच्या मनावर बिंबलेल्या उत्तरात प्रतिबिंबित झालेला होता. ४०-५० वर्षांहून अधिक काळ स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या या देशातील शिक्षकास स्त्रीची भूमिका आदर्श गृहिणी, पत्नी व माता यापेक्षा अधिक आहे, याची जाणीव असायला हवी. नाही तर आजच्या माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या बहुसंख्य मुली चूल आणि मूल या चाकोरीत जाऊन आपल्या गळ्यात फक्त मंगळसूत्र पडण्याचीच वाट पाहतील, अशी स्थिती निर्माण होऊ शकेल; परंतु सुदैवाने परिस्थिती सुधारताना दिसत आहे.

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीचा वाढता आलेख लक्षात घेता, आजकालच्या पालकांनाही त्याचे श्रेय द्यायला हवे. पूर्वीच्या काळी हाताच्या बोटावर मोजता येतील, असे पालक हे मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यायचे. आता थोड्या फार प्रमाणात पालकवर्ग घरातील मुलांसोबत मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यांना चांगल्या कोचिंग क्लासला पाठवणे, प्रश्नसंच, नोट्स, गाईड वेळेवर देण्यासाठी पालकही तितकेच जागृत झाल्याचे दिसून येतात. त्यातून आई-वडिलांकडून मिळणाऱ्या मानसिक पाठबळाचा मुलींना फायदा निश्चित होत असणार, त्यामुळे आईला स्वयंपाकाच्या कामात मदत करून मुलगी अभ्यास करते, असे वास्तव्यवादी दृश्य आपल्याला पाहावयास मिळते. गेली २ वर्षे कोरोनाच्या काळात गेली. शिक्षण ऑनलाइन सुरू होते. यंदाच्या बारावीच्या परीक्षा या ऑनलाइन की ऑफलाइन होणार यावरून शिक्षण खात्यात गुऱ्हाळ सुरू होते. तरीही शाळेतील शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन तुरळक मिळालेले असताना, मुलींची उत्तीर्ण संख्या अधिक आहे, हे यश निसर्गत: स्त्रीशक्तीत दडले आहे. जे सुप्त आहे त्याला अंकुरित करणे, जे अंकुरित आहे त्याला विस्तारित करणे, जे विस्तारित आहे त्याला खोली प्राप्त करून देण्याचे काम शिक्षकांचे आहे. आजच्या माध्यमिक शाळांत शिकणाऱ्या अनेक मुलींच्या मनात आपण कोणीतरी व्हावे, असे एक स्वप्न सुप्तावस्थेत असणार आहे, याची जाणीव शिक्षकांना असायला हवी. समाजजीवनातील स्त्रीची भूमिका केवळ गृहिणी, पत्नी, माता नसून ती यापेक्षा अधिक जबाबदारीची असल्याची जाण शिक्षकांनी ठेवायला हवी. स्त्रीला परंपरागत साच्यात कोंबण्याचा प्रयत्न करता कामा नये. आज शिक्षणात मुलींचा वाढता टक्का या सगळ्या गोष्टींची जाणीव समाजाला करून देतो आहे. एकंदरीत उत्तीर्णचा टक्का घसरत असताना मुलींचा टक्का वाढतो, हा आशेचा किरण असाच टिकून राहिला, तर समाजाचे भले होईल आणि त्यामुळे देश पुढे जायला मदत होईल, असे आम्हास वाटते.

Recent Posts

World Malaria Day 2025 : जागतिक मलेरिया दिन! पण मलेरियाचा शोध कुणी लावला?

आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…

32 minutes ago

CSK vs SRH, IPL 2025: चेन्नई व हैदराबाद आमने सामने

मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…

39 minutes ago

महारेरा ३६९९ प्रकल्पांच्या ‘ओसीं’ची सत्यता तपासणार!

मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…

2 hours ago

Pakistani Hindu Visa: पाकिस्तानी हिंदूंचा व्हिसा रद्द होणार नाही, सरकारची घोषणा

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…

2 hours ago

भारतीय वायुसेनेने सुरू केला युद्धाभ्यास

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…

2 hours ago

नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांमध्ये उचललाच पाहिजे, भूषण गगराणी यांचे निर्देश

मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८…

3 hours ago