Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीप्रदीप भिडे : हसऱ्या चेहऱ्यातले भारदस्त व्यक्तिमत्त्व

प्रदीप भिडे : हसऱ्या चेहऱ्यातले भारदस्त व्यक्तिमत्त्व

जयू भाटकर, माजी सहाय्यक संचालक, दूरदर्शन

आपल्या सभोवतालच्या जगात काही जण जन्मजात भारदस्त पावलांनी चालतात. तसेच भारदस्त जीवन जगतात. असंच आनंदी, स्वच्छंदी, निरागस आणि अजात शत्रू व्यक्तिमत्त्व म्हणजे वृत्तनिवेदक सूत्रसंचालक प्रदीप भिडे. २ ऑक्टोबर १९७२ ला मुंबई दूरदर्शनच्या कार्यक्रमाची सुरुवात वरळीच्या स्टुडिओतून झाली. काही दिवसांतच दूरदर्शन राष्ट्रीय कार्यक्रमातल्या इंग्रजी, हिंदी बातम्यांचे प्रसारण इथूनच सुरू झाले. अल्पावधीत मराठी बातम्या सुरू झाल्या. मराठी वृत्तविभाग कार्यान्वित झाला. अफाट वाचन, अमोघ वत्कृत्व, स्पष्ट शब्दोच्चार आणि निवेदकाला आवश्यक असणारा गद्यातल्या आवाजाचा भारदस्तपणा ही प्रदीपच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. मुंबई दूरदर्शन केंद्रात आपल्या उमेदीच्या दिवसांत सुरुवातीला त्याने निर्मिती सहाय्यक म्हणून त्यावेळचे ज्येष्ठ निर्माते आकाशानंद मनोहर पिंगळे, सुहासिनी मुळगांवकर यांच्यासोबत काम केले. अनेक कार्यक्रमांच्या निर्मितीत त्याचा सहभाग होता. पुढे अल्पावधीत मुंबई दूरदर्शनच्या, मराठी बातमी पत्रात नमस्कार ! दूरदर्शनच्या मराठी बातम्यात मी प्रदीप भिडे आपले स्वागत करीत आहे. या भारदस्त वृत्तनिवेदनाने मराठी रसिक प्रेक्षकांना अवघ्या महाराष्ट्राला आपुलकीचं वेड लावलं. समोरच्या व्यक्तीचं दिलखुलासपणे कौतुक करणे, हा प्रदीपचा स्थायीभाव होता. बातम्या देण्याच्या त्याच्या स्वतंत्र आणि वेगळ्या शैलीने तो वृत्तनिवेदक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. या लोकप्रियतेमुळेच असंख्य लघुपटांचे निवेदन, अगणित जाहिरातींमधला त्याचा आवडणारा हवाहवासा वाटणारा आवाज, सार्वजनिक ठिकाणी होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रमातील त्याचे सूत्रसंचालन, मा. राष्ट्रपती महोदय, मा. पंतप्रधान महोदय, मा. राज्यपाल महोदय यांच्या उपस्थितीतील अनेक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक, कार्यक्रमातील प्रदीपचे सूत्रसंचालन म्हणजे रसिक श्रोत्यांना श्रवणाची आनंद पर्वणी होती. राज्य विधिमंडळातील अर्थसंकल्पिय अधिवेशनातील पहिल्या दिवशी मा. राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद हा प्रदीपच्या आवाजातच विधिमंडळ सदस्यांनी वर्षानुवर्षे ऐकला. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे शिवाजी पार्कवरील मुख्य ध्वजारोहण संचलन तसेच १ मे, महाराष्ट्र दिनाचा राज्यातला मुख्य कार्यक्रम याचे समालोचन सूत्रसंचालन त्याने कित्येक वर्षं केले. ते मी प्रत्यक्ष अनुभवले. कालांतराने आयुष्याच्या स्थित्यंतरात वृत्तनिवेदनाचं काम चालू ठेवून त्यानं खासगी क्षेत्रात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केलं. पुढे स्वतःचा डबिंग स्टुडिओ व्यवसाय सुरू केला.

वृत्तनिवेदक म्हणून तो कार्यरत असताना मुंबई दूरदर्शनच्या वृत्तविभागात १९९१ ते १९९३ या दोन वर्षांच्या कालावधीत वृत्तनिर्माता म्हणून कार्यरत असताना मला प्रदीपला वृत्तनिवेदक म्हणून जवळून पाहता आले. निर्मात्याची प्रत्येक सूचना वृत्तनिवेदकाने तंतोतंत पाळावी, ही त्याची शिस्त होती. थेट प्रसारित होणाऱ्या (स्पअम) बातम्यांपूर्वी लिखित बातमी आणि संदर्भ दृष्य यांची तालिम घ्यायला त्याने कधीच आढे-वेढे घेतले नाही. पुढे महाचर्चा कार्यक्रमात तो सूत्रसंचालक म्हणून सहभागी झाला. जवळजवळ १० वर्षे त्याने महाचर्चेमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम केले. विविध विषयांवरच्या या प्रासंगिक थेट प्रसारित होणाऱ्या चर्चा कार्यक्रमात प्रदीपने स्वयंशिस्तीचे कधी उल्लंघन केले नाही. सहभागी होणाऱ्या मान्यवरांना प्रश्न विचारताना आपण त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे केलेले नाही, या प्रसारण माध्यमातल्या सभ्यता संकेतानं त्याने प्रत्येक कार्यक्रम यशस्वी केला. राज्यातल्या, देशातल्या, विदेशातल्या अनेक मराठी दिग्गजांच्या त्यानं घेतलेल्या मुलाखती हा दूरचित्रवाणी क्षेत्रातला सांस्कृतिक ठेवा आहे. त्याची झलक ‘कोर्ट मार्शल` या मुलाखत कार्यक्रमात मला जवळून पाहता आली. सन २००२ साली ‘कोर्ट मार्शल` या मुंबई दूरदर्शनच्या मुलाखत कार्यक्रमाची निर्मिती जबाबदारी माझ्यावर आली.

पुढे मराठी विश्वातल्या अनेक मान्यवरांच्या मुलाखती त्याने सहज सुंदरपणे घेतल्या. त्या आजही मुंबई दूरदर्शनच्या संग्रही आहेत. तो समोर आल्यावर मित्रा कसा आहेस, असा आपल्या भारदस्त आवाजात घरच्या आपुलकीने बोलायचा. तेव्हा अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहायचे. पहिल्या भेटीत कुणालाही आवडावं असं त्याचे व्यक्तिमत्त्व होते. मुंबई दूरदर्शन केंद्रातल्या प्रत्येकाचे प्रदीपवर प्रेम होते. त्याचं वागणं, बोलणं सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारं होतं. वयाच्या पन्नाशीनंतरही लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊनही त्याच्या डोक्यात कधी अहंकारी विचारांचे वादळ घोंघावलं नाही. आचार-विचाराने त्याचे पाय मातीत रुतलेले होते. काळाच्या ओघात महाराष्ट्राच्या घराघरात, मराठी माणसाच्या मनामनात हृदयसिंहासनावर विराजमान झालेला प्रदीप एका दुर्धर आजाराने अंथरुणावर खिळला, याची चाहूल लागण्याचा एक प्रसंग मला आठवतो. महाचर्चाचे थेट प्रसारण सुरू झाले. प्रदीप सूत्रसंचालक होता. अर्ध्या तासानंतर सूत्रसंचालन करताना तो थांबला. काही सेकंद त्याला बोलणचं सुचेना. त्याने स्वतःला सावरलं आणि तो महाचर्चा त्याने सावरून नेला. काही दिवसांनी त्याच्या सुरू झालेल्या आजारपणाची बातमी कळली. आमचं फोनवर बोलणं झालं. सध्या कार्यक्रमात येणार नाही, लवकरच बरा होईन आणि महाचर्चा करू असं तो म्हणाला. पुढे मुंबई दूरदर्शनच्या २ ऑक्टोबर ‘वर्धापन`दिनाचा एक विशेष कार्यक्रम महाचर्चेत प्रसारित झाला. त्यात कार्यक्रम विभागातल्या सगळ्या जुन्या जाणत्या ज्येष्ठ निर्मात्यांबरोबर प्रदीपलाही बोलावले.

प्रदीपच्या सोबत त्याची पत्नी सुजाता वहिनी होती. एरवी हत्तीच्या पावलाने चालणारा हा भारदस्त माणूस मेकअप रूममधून स्टुडिओमध्ये जाताना सुजाताच्या आधाराने हात धरून गेला. तेव्हा मी अस्वस्थ झालो होतो. पुढे त्याचा आजार बळावला. त्या अवस्थेत त्याला पाहणं कठीण होतं. एकदा मनाचा धीटपणा करून अंधेरीत त्याच्या घरी त्याला भेटलो. ती आमची शेवटची भेट. पुढे ४-५ वर्षे आजाराला झुंज देणारा प्रदीपचा जीवनप्रवास आज ६५व्या वर्षी थांबला. वर्षभरापूर्वी अतिरेकी सोशल मीडियाच्या घाईगर्दीत चुकीच्या बातम्या देण्याच्या अफवावृत्तीने त्याचा न झालेला मृत्यूही घडवून आणला. त्यावेळी आमच्या या मित्राचं आयुष्य वाढावं, असं सर्वांनाच वाटलं. आज प्रदीप गेल्याची बातमी कळली. अर्थात ती अफवा नव्हती. भारदस्त आवाजाचा, हसऱ्या चेहऱ्याचा, जिंदादिल स्वभावाचा, सर्वांना हवाहवासा वाटणारा प्रदीप हे जग सोडून गेला, ही बातमी खरी होती.

प्रभावशाली वृत्तनिवेदक, प्रतिभासंपन्न सूत्रसंचालक आणि अष्टावधानी मुलाखतकार या वैभवी परंपरेतल्या एका प्रदीप युगाचा अस्त झाला. त्याला भावपूर्ण आदरांजली!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -