Sunday, March 23, 2025
Homeमहत्वाची बातमीप्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी ऑनलाईन प्रणाली सुरू

प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी ऑनलाईन प्रणाली सुरू

मुंबई (प्रतिनिधी) : ग्रामविकास विभागामार्फत होणाऱ्या जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक करण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. कोरोना काळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. मात्र आता या ऑनलाईन संगणकीय प्रणालीमुळे शिक्षकांच्या बदल्याना गती मिळेल. राज्यात आजमितीस जवळपास २ लाख प्राथमिक शिक्षक असून या प्रणालीमुळे कोणत्याही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होणार नाही, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यासाठी ग्रामविकास विभागाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून सन २०२२ मधील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या प्रणालीचे अनावरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गुरूवारी मंत्रालयात करण्यात आले.

या कार्यक्रमास ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव का.गो.वळवी, पुणे जिल्हा परिषद सीईओ तथा समिती अध्यक्ष आयुष प्रसाद, सातारा जिल्हा परिषद सीईओ विनय गौडा, पुणे स्मार्ट सीटीचे सीईओ संजय कोलते, जिल्हा परिषद सीईओ वर्धा सचिन ओंबासे, मुंबई मनपा सहआयुक्त अजित कुंभार, एमएमआरडीए सहआयुक्त राहुल कर्डीले, त्याचप्रमाणे आज्ञावली विकसित करणारे विन्सीस आयटी सव्हिसेस आणि साय-फ्युचर इंडिया प्रा.लि.चे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

आंतरजिल्हा बदली : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्यास किमान ५ वर्षे सलग सेवा होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पक्षघात, दिव्यांग कर्मचारी, शस्त्रक्रिया झालेले, विधवा, कुमारिका शिक्षक, परित्यक्ता तसेच वयाने ५३ वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी त्याचबरोबर पती-पत्नी एकत्रिकरण आदींची विशेष संवर्ग शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्हांतर्गत बदली : जिल्हांतर्गत बदली करतांना ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण आणि विद्यमान शाळेत ५ वर्षे पूर्ण झाली आहे, अशा शिक्षकांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हातील अवघड क्षेत्र आणि शाळाची यादी घोषित करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली असून यासंदर्भात प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. बदलीस पात्र शिक्षकांना जिल्ह्यातील ३० शाळांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे पक्षाघाताने आजारी शिक्षक, दिव्यांग शिक्षक, शस्त्रक्रिया झालेले शिक्षक, विधवा शिक्षक, कुमारिका शिक्षक, परित्यक्ता-घटस्फोटीत महिला शिक्षक तसेच व्याधिग्रस्त शिक्षकांबरोबरच पती-पत्नी एकत्रिकरण आदी या विशेष संवर्ग शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदली नको असल्यास अर्ज करावा लागणार आहे.

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी ६ टप्पे ठरविण्यात आले असून त्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या बदल्यांबाबत अनियमिततेची तक्रार आल्यास त्याचा निपटारा करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -