नवी दिल्ली : देशात कोरोना साथरोगाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झालीय. गेल्या २४ तासात ७ हजार २४० नवे कोरोनाग्रस्त आढळून आले. त्यामुळे देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ३२ हजार ४९० झाली आहे. ही वाढ सुमारे ४० टक्के आहे. बुधवारी दिवसभरात ५ हजार २३३ कोरोनाबाधितांची भर पडली होती.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक २,७०१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. तर राजधानी दिल्लीत ५०० नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या ४ महिन्यांतील सर्वात मोठी वाढ आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्येतही ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून येत आहेत.
राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिवसाला ८०० – ९०० असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत. तर, देशात गेल्या तीन महिन्यांनी दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, गेल्या एका दिवसात दैनंदिन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत तब्बल ४० टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.