नागपूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेच्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे नागपुरातील पाराही चढाच आहे. याच उष्णतेच्या लाटेने नागपुरात ३ दिवसांत तब्बल ४ बळी घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रस्त्यावर बेशुद्धावस्थेत सापडलेल्या ४ व्यक्तींना रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण नागपुरात भितीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडूनही वारंवार काळजी घेण्याचे आवाहन नागपूरकरांना केले जात आहे. दरम्यान, सध्या नागपुरातील तापमानाचा पारा ४५ अंशांवर आहे.
६, ७ आणि ८ जून रोजी नागपूर शहरातील विविध भागात चार अनोळखी व्यक्ती रस्त्यावर बेशुद्धावस्थेत आढळून आल्या होत्या. पोलिसांनी त्यांना त्यावेळी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सध्या नागपुरात गेले अनेक दिवस तापमान सलग ४५ अंशांच्या वर आहे. त्यामुळे रस्त्यावर जीवन जगणाऱ्या या चौघांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला आहे का? असा संशय निर्माण झाला आहे.
६ जून रोजी नागपुरातील गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत अशोक चौक येथे ५० वर्षीय पुरुष बेशुद्ध पडले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत जाहीर केले होते. तर, ७ जून रोजी सदर पोलीस स्टेशन अंतर्गत गड्डीगोदाम चौक येथे ५० वर्षीय पुरुष बेशुद्ध पडले होते, रूग्णालयात डॉक्टरांनी त्यांनाही तपासून मृत जाहीर केले होते. त्यानंतर ८ जून रोजी सदर पोलीस स्टेशन अंतर्गत छावणी बस स्टँड ४५ वर्षीय महिला बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तपासल्यानंतर डॉक्टरांनी तिलाही बेशुद्ध घोषित केलं होतं. तर, ८ जून रोजी अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत टिबी वॉर्ड परिसरात ३७ वर्षीय पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळला डॉक्टरांनी त्याला मृत जाहीर केले.
गेल्या १० दिवसांत नागपुरात कमालीची वाढ झाल्याचे आढळून आले आहे. नागपुरातील वाढलेल्या पाऱ्यामुळे अंगाची लाहीलाही झाली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याच्या इतरही समस्यांचा सर्वसामान्यांना सामना करावा लागत आहे.