मुंबई : विधान परिषदेसाठी पाच उमेदवार जाहीर केले आहेत. आमच्या पार्टीत सर्वजण कोरी पाकीट असतो. जो पत्ता लिहील तिथे जावे लागते. त्यामुळे राजकारणात चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते आणि निर्णय हे शेवटी पक्षाचे असतात. त्यामुळे केंद्राने केलेला निर्णय हा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून सर्वांनी त्याचे पालन करायचे असते. पंकजा ताई यांच्या उमेदवारीसाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. मात्र केंद्राने काही भविष्यातील विचार करुन हा निर्णय घेतला असावा, अशी प्रतिक्रीया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी घोषित केल्यानंतर दिली.
आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. या निवडणुकीसाठी पंकजा मुंडेंचा पत्ता कट केला आहे का? या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, पंकजा मुंडेंसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आणि आम्ही खूप प्रयत्न केले. मात्र मुंडे यांच्याऐवजी भाजपाकडून उमा खापरे यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे.
पुढे ते म्हणाले, ईच्छा व्यक्त करणे आणि नाराजी व्यक्त करणे यात काही गैर नाही. मात्र भाजपातील नाराजी लगेच भरली जाते. पंकजा मुंडे यांच्याकडे सध्या उत्तर प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. आणखी कोणतीतरी जबाबदारी संघटनेला पंकजा मुंडे यांच्याकडे सोपवायची असु शकते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपाकडून या निर्णयाचे स्वागत आहे, असेही चंद्रकांत पाटलांनी सांगितले.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यसभा तसेच विधान परिषदेसाठीही पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. मात्र राज्यसभेतही पंकजा यांना उमेदवारी डावलण्यात आली. राज्यसभेसाठी भाजपाने पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्यांना उमेदवारी मिळाली, त्यांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली होती. मात्र आता विधान परिषदेसाठीही पंकजा यांना डावलण्यात आले आहे.