Thursday, December 12, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यघरातील ज्येष्ठ सदस्यांना सांभाळणे सर्वांचेच आद्यकर्तव्य!

घरातील ज्येष्ठ सदस्यांना सांभाळणे सर्वांचेच आद्यकर्तव्य!

  • मीनाक्षी जगदाळे

मातृ दिन, पितृ दिन धुमधडाक्यात साजरे करणारे आणि आपल्याला आई-वडिलांप्रती, सासू-सासऱ्यांप्रती किती निर्व्याज्य नि:स्वार्थी प्रेम आहे, हे दाखविण्यासाठी सामाजिक माध्यमातून या सोहळ्याचे फोटो पोस्ट करणारे आपण सगळेच कुठेना कुठे या लेख लिखाणामागे कारणीभूत आहोत. आजच्या समाजात घराघरांतील ज्येष्ठ सदस्यांचे होत असलेले हाल, अपमान, आर्थिक असहायता, परावलंबीपणा हे विदारक चित्र पाहायला मिळते. आपल्या घरातही सत्य परिस्थिती अशी असेल आणि आपण स्वतः तसे वागत असल्यास आपली मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक आहे. समुपदेशनादरम्यान आलेल्या बहुतांश प्रकरणांचा सारांश काढून हा लेख आपल्यापर्यंत पोहोचविणे आणि ज्येष्ठांची अवहेलना थांबविण्यासाठी थोडाफार तरी हातभार लावणे हा उद्देश लेख लिहिताना समोर ठेवलेला आहे.

एकत्र कुटुंब पद्धती जसजशी संपुष्टात येऊ लागली, तसतसे घरातील वयोवृद्ध सदस्यांचे हाल वाढत गेले असून त्याबाबत फारसे कोणाला काही वाटताना दिसत नाही. पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे असल्यास, त्यांना लहान मुलं असल्यास सासू-सासऱ्यांनी या मुलांचे संगोपन करावे, घरातील इतर काम करावीत ही अपेक्षा असते. तरीही दोन पिढ्यांतील भिन्न विचारसरणी यामुळे खटके उडताना दिसतात. अशा प्रसंगी सासू-सासऱ्यांना ज्येष्ठपणाचा मान-सन्मान मिळणे, तर सोडाच. पण दररोज घरगुती कटकटींना सामोर जावे लागते. भावाभावांमध्ये बहिणींमध्ये आई-वडिलांना कोणी सांभाळायचं, त्यांची आर्थिक जबाबदारी, औषधोपचाराची जबाबदारी कोणी घ्यायची यावरून सर्रास वाद-विवाद होताना दिसतात.

कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची प्रॉपर्टी मात्र सर्वांना हवीशी वाटते. अनेक घरांमध्ये ज्येष्ठांवर ते हयात असतानाच त्यांच्यावर दबाव टाकून, त्यांची दिशाभूल करून त्यांची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेण्याची प्रवृत्ती समाजात बोकाळताना दिसते. आई-वडीलही उदार मनाने मुला-मुलींच्या मागण्या पूर्ण करतात. अनेक कुटुंबात ज्येष्ठ व्यक्तींना सांभाळले जाते. पण त्यांना पुरविल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधा हीन दर्जाच्या असतात. अनेकजण तर आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. श्रीमंत आणि सुशिक्षित घरातील ज्येष्ठ उतारवयात मानसिक, शारीरिक आजारांमुळे वृद्धाश्रमात खितपत पडलेले दिसतात. काही सुशिक्षित सुनांना घरात सासूशी पटवून घेणे कठीण जाते. जुन्या पिढीची मते, विचार, वागणूक ही त्यांच्या अनुभवातून आलेली असते. वयोमानाने त्यांचा स्वभाव थोडाफार हट्टी, चिडचिडा झालेला असतो. पण यातून प्रेमाने मार्ग काढणे आवश्यक आहे. ज्यांची मुलं विदेशात स्थायिक आहेत, त्यांना उतारवयात एकाकीपणा भेडसावत असतो. त्यात जीवनसाथी जग सोडून गेला, तर उर्वरित आयुष्य काढणे एकट्या राहिलेल्या पती-पत्नीसाठी कठीण असते. वयोवृद्ध दाम्पत्य एकत्र कुटुंबात राहत असतील तरी त्यांना अनेकदा सदस्यांचे टोमणे, भांडण, हेवे-दावे यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. यापेक्षाही बिकट परिस्थिती त्या ज्येष्ठ नागरिकांची आहे, ज्यांना कोणत्याही दीर्घ असाध्य आजाराने ग्रासलेले आहे. त्यांना योग्य औषधोपचार देणे कुटुंबातील इतर सदस्यांसाठी खूप अवघड झालेले दिसते. अशा वेळी घरातील वातावरण बिघडू न देता परिस्थिती हाताळणे क्रमप्राप्त असते.

आजच्या समाजरचनेत वयोवृद्ध नागरिकांसाठी आमूलाग्र बदल होणे अपेक्षित आहे. एकट्या ज्येष्ठांना जागेवर, वेळेत वैद्यकीय मदत मिळणे, त्यासाठी ज्येष्ठांना कायद्याने संरक्षण देणे, वडीलधाऱ्यांना कोणत्याही स्वरूपाची मदत मिळण्यासाठी विविध मदत केंद्र अस्तित्वात येणे, त्यांच्यासाठी मुला-मुलींनी एकत्र येऊन योग्य त्या जबाबदाऱ्या पार पाडणे काळाची गरज आहे. आई-वडील हयात असेपर्यंत त्यांची जबाबदारी झिडकारून त्यांची मालमत्ता कोणीही कोणत्याही चुकीच्या मार्गाने हडप करू शकणार नाही, यासाठी कठोर कायदा अमलात आणणे गरजेचे आहे. मुले-मुली नोकरी-व्यवसाय, शिक्षण या कारणास्तव जिथे स्थायिक होतील तिथेच त्यांनी स्वतःसोबत वृद्ध माता-पित्याची सोय करणेही बंधनकारक होणे आवश्यक आहे.

आपल्या घरातील वयोवृद्ध व्यक्तीला सांभाळणं तेही कायद्याच्या धाकापोटी अथवा मनाविरुद्ध, नाईलाजाने असे घडणेच मुळात चुकीचे आहे. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी थोडेफार तरी योगदान दिलेले असतेच, आपल्यासाठी त्रास काढलेला असतोच याची जाणीव आणि त्यांच्यावरील निस्सीम प्रेम यातून त्यांची सेवा होणे आवश्यक आहे आणि मुळात आपण आपल्या माता पित्यांना, सासू सासऱ्यांना अथवा घरातील कोणत्याही ज्येष्ठ सदस्याला जी वागणूक देऊ तिच आपल्या मुलांनी आपल्याला म्हातारपणी दिली, तर ते आपल्याला सहन होईल का? या गोष्टीचा गहन विचार होणे आवश्यक आहे. घरोघरी मिळणाऱ्या हिन दर्जाच्या वागणुकीमुळे अनेक वृद्ध वयस्कर लोकांनी आत्महत्या करणे, घरातून निघून जाणे यासारखे प्रकारही घडलेले आहेत. त्यामुळे या विषयावर समाज परिवर्तन घडणे काळाची गरज आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -