मुंबई : भारतीय रिझर्व बँकेने आज नवे पतधोरण जाहीर केले. यामध्ये बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात ०.५० टक्क्यांची वाढ केली आहे. महिन्याभरातली ही दुसरी वाढ आहे. यामुळे आता रिझर्व बँकेचा रेपो दर ४.९० टक्के झाला आहे.
रिझर्व बँकेने रेपो दरात वाढ केल्याने आता सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होणार आहेत. कारण आता बँकांच्या कर्जाची किंमत वाढणार आहे. रेपो रेट हा असा दर आहे, ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेतात. हा दर वाढल्याने आता बँकांना जास्त दराने कर्ज मिळणार आहे. त्यामुळे बँका ग्राहकांकडून चढ्या दराने व्याज घेणार आहेत.
यापूर्वीही रिझर्व बँकेने आपल्या दरामध्ये ०.४० टक्क्यांची वाढ केली होती. रेपो दरात यापुढेही आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. चलनवाढीचा दर समाधानकारक पातळीवर आणण्याच्या दबावामुळे पॉलिसी रेट वाढवण्याची शक्यताही रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवली आहे.