मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली असून राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या नव्या तीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत या नेत्यांचा पत्ता कट झाला आहे.
राज्यसभा तसेच विधान परिषदेसाठीही पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र राज्यसभेतही पंकजांना उमेदवारी डावलण्यात आली. राज्यसभेसाठी भाजपाने पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्यांना उमेदवारी मिळाली, त्यांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली होती. तर विधान परिषदेवर पाठवायचे की नाही हा निर्णय पक्ष घेईल, अशी अपेक्षाही त्यांनी तेव्हा व्यक्त केली होती.
दरम्यान, भाजपाने उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या नव्या चेहऱ्यांना यंदा विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. उमा खापरेंच्या रुपाने महिला मोर्चाच्या नेतृत्वाला प्रतिनिधित्व मिळाले आहे. तर प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे.