Saturday, December 14, 2024
Homeमहत्वाची बातमीदेवतांचा अवमान सहन करणार नाही

देवतांचा अवमान सहन करणार नाही

शिवलिंग विटंबन प्रकरणी नितेश राणे यांचा इशारा

नाशिकमध्ये हिंदू जन आक्रोश समितीच्या मोर्चानंतर पोलिसांना दिले निवेदन

नाशिक (प्रतिनिधी): ‘हिंदूच्या देवदेवतांची प्रकारे विटंबना केली जात आहे, उद्धव ठाकरे म्हणजेच बाळासाहेबांचा मुलगा हे कसे सहन करू शकतो?’ असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तसेच ‘शरद पवारांवर जिने कविता लिहिली तिला आत टाकले, मग हे विटंबना करणारे का सापडत नाहीत, हिंदू संघटनांनी संयम सोडला तर बोलू नका. संबंधितांवर कारवाई झाली नाही तर आमचा संयम सुटेल’, अशा कडक शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

नाशिकच्या इंदिरानगर परिसरात हिंदू देवदेवतांची विटंबना केल्या प्रकरणी मंगळवारी नाशिकमध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश समितीद्वारे मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाला नाशिककरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बि.डी. भालेकर मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर शालिमार मार्गे हा मोर्चा जिमखाना, सारडा कन्या विद्यालय, रेड क्रॉस सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात आमदार सीमा हिरे , देवयानी फरांदे, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, महंत अनिकेत शास्त्री जोशी,लक्ष्मण सावजी, माजी दिनकर पाटील, नगरसेवक मुकेश शहाणे, हेमंत शेट्टी, देवदत्त जोशी, चंद्रशेखर पंचाक्षरी, अनिल भालेराव, सुजाता करंजीकर यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील हिंदू प्रेमी नागरिक, कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये ‘जय श्रीराम’ आणि ‘बजरंग बली की जय’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा आल्यावर पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर आ. राणे यांनी जोरदार टीका केली. राज्यभरात हिंदूच्या देवांची अशा प्रकारे विटंबना केली जात आहे. याला आवर घालणे आवश्यक आहे. मात्र यावर काहीच कारवाई होत नाही. बाळासाहेबांचा मुलगा हे कसे सहन करू शकतो. हिंदू देवदेवतांची विटंबना करण्याची, सोशल मीडियावर पोस्ट करण्याची या लोकांना अशा प्रकारे सूट दिली आहे का? या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा या नंतर जर कायदा – सुव्यवस्था बिघडली तर आम्ही जबाबदार राहणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान याच संदर्भात बोलतांना नितेश राणे म्हणाले कि, पवारांवर कविता लिहिली तिला आत टाकली. मग हे गुन्हेगार का सापडत नाहीत. या प्रकरणी पोलिसांना सगळी माहिती दिली आहे. पोलिसांनी खरी मर्दानगी आता दाखवावी. नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. मागील २० दिवसांत आठ हत्या झाल्या आहेत. त्यामुळे सिंघम सारखे सगळीकडे कारवाईसाठी जाणारे नाशिकचे पोलीस आता काय करत आहेत? असा सवाल त्यांनी नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केला. राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सडकून टीका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना काँग्रेस राष्ट्रवादीची भीती वाटते. ते औषध देखील त्यांना विचारल्या शिवाय घेऊ शकत नाहीत. ते काय औरंगाबादचे नाव बदलणार. मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना लपवून ठेवावे लागते ही वेळ आली असून एके काळी शिवसेनेच्या धाकाने इतर पक्षांचे आमदार पळायचे. आता यांचे आमदार पळत आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

सोशल मीडियावर शिवलिंग विटंबना प्रकरणी पोलीस कारवाई करत नसल्याचा भाजपने आरोप केला. पोलिसांनी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजप पण हा मोर्चा काढला. नितेश राणे यांच्यासह भाजपाचे असंख्य कार्यकर्ते मोर्चात सहभागी होते. सोबतच काही अन्य हिंदुत्ववादी संघटना सुद्धा मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान नाशिकच्या बी डी भालेकर मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -