- अरुण बेतकेकर
(माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना)
धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’’, हा सिनेमा पाहिला. सुंदर, प्रेक्षणीय उतरला आहे. चित्रपट आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे. प्रामुख्याने त्यांच्या शिवसैनिक असण्यावर. स्वकर्तृत्वाने दिघे महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या मनावर स्वार झाले होते. त्यांनी निर्माण केलेले स्वतःचे वलय इतके प्रखर होते की लहान-थोर, स्त्री-पुरुष, ज्येष्ठ-श्रेष्ठ त्यांचे पदस्पर्श करत. शिवसेनेत बाळासाहेबांनंतर असे प्रेम जर कोणास प्राप्त झाले असतील तर ते आनंद दिघे यांस. हीच अनेकांची पोटदुखीही ठरत होती. हा चित्रपट दिघे प्रेमियांसाठी पर्वणी, जुन्या आठवणींना उजाळा देणारा, प्रेरणादायी.
आनंद दिघे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. आम्ही सतत संपर्कात होतो. त्यांच्याविषयी काही बऱ्या-वाईट आठवणी आहेत. त्यांच्या ‘मातोश्री’ भेटी दरम्यान त्यांना ठरवून जाणीवपूर्वक दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचा, खच्चीकरणाचा मी साक्षीदार आहे. पण हा लेख चित्रपटाविषयी असल्याने याविषयी पुढे कधी लिहीन. धर्मवीर या उत्कंठावर्धक सिनेमात एक बाब प्रकर्षाने खटकली. सिनेमा बहुतांशी सत्यावर आधारित आहे. त्यातील बाळासाहेब ठाकरे, नारायण राणे, राज ठाकरे ही पात्रही जशीच्या तशी. त्यानुसार मो. दा. जोशी, सतीश प्रधान, प्रकाश परांजपे, एकनाथ शिंदे, राजन विचारे, वसंत डावखरे वगैरे वगैरे. सिनेमात एक गंभीर प्रसंग आहे. ठाणे महापौर निवडणुकीत निश्चित असलेला सेनेचा विजय आणि प्रकाश परांजपे यांचे महापौरपद, सेनेचेच नगरसेवक फोडत काँग्रेसचे वसंत डावखरे विजयी होतात. अशा प्रसंगी “लोकप्रभा” साप्ताहिकाचे एक पत्रकार दिघेंच्या मुलाखतीसाठी तेथे अवतरतात. पत्रकार उल्हासित, त्यांना दिघे एक-दोन प्रश्न घेऊन अति होतंय म्हणत हाकलवून लावतात. पण या पत्रकाराचे नाव मात्र लपवले गेले आहे. कदाचित हा प्रसंग प्रेक्षकांपासून दुर्लक्षित राहिला असावा. दिग्दर्शकानी त्याची देहबोली, हातवारे, डोळ्यांच्या हालचाली व एकूण सर्वच मर्कटचेष्ठा आणि सबटाईटलमध्ये लोकप्रभाचा उल्लेख करत तो कोण याचे संकेत दिले आहेत. या प्रत्यक्ष घटनेदरम्यान उपस्थित दिघे यांच्या निकटवर्तीयांच्या स्मृतिपटलावर तो पत्रकार कोण याचा उलगडा झाला असावा. पण बहुतांश प्रेक्षकांना तो पत्रकार कोण याचा उलगडा होणे अशक्य.
त्या काळात एकमेव पत्रकार जो लोकप्रभातून शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबावर सातत्याने जहरी टीका करीत असे. या पत्रकाराच्या विकृत आणि विखारी लिहिण्याने बाळासाहेब इतके व्यतीत झाले होते की याला ठेचून अंथरुणाला खिळवून ठेवण्याची सुपारी आम्हाला दिली होती. त्यातून तो बचावला. आज स्वतःस शिवसेनेचा कर्ता-धर्ता मीच, असे नाव शिवसैनिकांसह जनतेवर बिंबवण्याचा आटापिटा करीत असतो. हा पत्रकार कोण ते जाणण्याची वाचकाची उत्कंठा शिगेला पोहोचल्या असतील. तर ऐका, तो पत्रकार अन्य कोणी नसून सध्याचे सेनेचे विश्वप्रवक्ते आणि शरद पवारांचे लाडके “संजय राऊत”. चित्रपटात सर्वच पात्र जशीच्या तशी दाखवताना राऊत यांचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यामागील गोम काय? हा उत्कंठेचा सवाल उरतो. आनंद दिघे – राज यांचे ऋणानुबंध दांडगे. त्याच बांधिलकीने दिघेंच्या अपघाताने राज व्याकुळ होऊन उत्स्फर्तपणे इस्पितळात त्यांना पाहण्यासाठी पोहोचतात हा प्रसंग प्रभावीपणे मांडत राज हेच ठाकरे कुटुंबाचे – शिवसेनेचे वारसदार असे दाखविण्याचे धाडस निर्माते – दिग्दर्शकांनी केले आहे. ते कौतुकास्पद! पण ते पत्रकार संजय राऊत, हे का लपवले गेले आहे? त्यावेळच्या लोकप्रभा अंकातील, महापौर निवडणुकीत प्रकाश परांजपे यांचा पराभव आणि त्यानंतर झालेली नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या. एप्रिल १९८९ ते जून १९९२ संजय राऊत यांच्या लोकप्रभेतील कार्यकाळात लिहिले गेलेले आनंद दिघे आणि ठाण्यातील शिवसेनेचे राजकारण या संबंधित सर्व लेख पाहता संजय राऊतांचा दिघे आणि शिवसेनाबाबतच्या द्वेषभावना स्पष्ट होतात. त्यातील काही अंश…
लोकप्रभा, जून १९८९ : “होय गद्दारांची हत्या होईल! या शीर्षकाखाली दिघेंना विचारले गेलेले खोचक प्रश्न – १) प्रकाश परांजपेंची निवड करून तुम्ही चूक केलीत असं वाटत नाही का? २) दगाबाज नगरसेवकांची हत्या होईल, हे तुमचे विधान हिंसेला चिथावणी देणारे नाही का? ३) आतापर्यंत तुम्ही काँग्रेसचे नगरसेवक फोडत होता. आज तुमचे फुटले… त्यात विशेष काय?
लोकप्रभा, ११ जून १९८९ : दिघे यांच्या “होय, मी माझ्या मतांशी ठाम आहे!” या शीर्षकाखालील मुलाखतीत राऊतांनी विचारलेले काही चिथावणीखोर प्रश्न – १) श्रीधर खोपकर खरंच गद्दार होते का? २) हत्येबद्दल तुम्हाला दुःख होते का? ३) तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते अंतयात्रेत का उपस्थित राहिला नाहीत? ४) सुटून आल्यावर तरी तुम्ही त्यांच्या घरी गेला होता का? ५) तुमच्यानंतर निर्णय घेणारा नेता का निर्माण झाला नाही? ६) या प्रकरणात शिवसेनेने तुम्हाला वाऱ्यावर सोडले? लोकप्रभा, १ मार्च १९९२ : “लूट झालेल्या पालिकेसाठी ठाण्यात संघर्ष” या लेखात राऊत लिहितात, “ठाण्यातील टेंभी नाक्यावर आनंद मठ आहे. त्या पडक्या मठात एक दाढीधारी महाराज बसतात. हे आनंद महाराज त्या मठातून शिवसेनेच्या नावाने राज्य करतात.”
लोकप्रभा, ८ मार्च १९९२ : “आनंद दिघे यांच्या मनाप्रमाणेच ठाण्यात घडले” या लेखात राऊत लिहितात, “नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत ठाण्यात सत्ता काबीज करण्याची भाषा दिघे करीत होते. त्याचवेळी शिवसेनेस निर्विवाद बहुमत मिळू नये यासाठी दिघे आतून काँग्रेसला मिळाले आहेत. अशी चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात होती. शरद पवार ठाण्यात आले आणि दिघे त्यांच्या खास भेटीसाठी गेले.”
सारेच शिवसैनिक त्याकाळी आनंद दिघे हे बाळासाहेबांनंतर शिवसेनेतील क्रमांक २ चे नेते असे मानत असत. त्यांच्याच सान्निध्यात वावरलेले, संस्कारात वाढलेले, त्यांच्यावर झालेल्या न्याय-अन्यायाची जाणीव असणारे एकनाथ शिंदे, पदोपदी या चित्रपटात आनंद दिघे यांच्याबरोबर सावलीसारखे वावरताना दिसतात. अलीकडे आपणांस शिवसेनेतील क्रमांक २ चे नेते मानले जात होते. हे अभिमानास्पद! पण आज चित्र बदलताना दिसत आहे. संजय राऊत कधीच शिवसैनिक नव्हते, आजही नाहीत. तरी त्यांनी आघाडी घेतलेली जाणवते. राऊतांनी, दिघे यांचा कायम द्वेष केला, विरोधी लिखाण केले. शिंदे, हे आपल्या स्मरणात असेलच. तेच राऊत आज चौथ्यांदा राज्यसभेची निवडणूक लढवत आहेत.