नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद एक संशयित रुग्ण आढळून आला होता. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. याचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. त्यामुळे देशात मंकीपॉक्सचा अद्याप शिरकाव झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेली दोन वर्षे देश कोरोना महामारीने त्रस्त झालेला आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असतानाच पुन्हा विविध राज्यांत कोरोनाची आकडेवारी वाढू लागली आहे. त्यातच म्युकरकोसिसचा धोका टळला आहे. पावसाळ्यात ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींच्या आजाराचे रुग्ण विविध राज्यांमध्ये विशेषत: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. या पार्श्वभूमीवर मंकी फॉक्सचा शिरकाव होण्याच्या भीतीने देशाच्या आरोग्य यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. परंतु संशयित रूग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे. एएनआयच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथे आढळलेला संशयित मंकीपॉक्सच्या रुग्णाचे नमुने पुण्यातील आयसीएमआर-एनआयव्हीला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने या आजारासंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. देशात संशयित रुग्ण आढळल्यावर त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठवले जातील, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगण्यात आले आहे. हे नमुने एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमाअंतर्गत पाठविले जातील. तसेच अशी प्रकरणे संशयास्पद मानली जातील, ज्यामध्ये कोणत्याही वयोगटातील व्यक्ती ज्याचा गेल्या २१ दिवसांत मंकीपॉक्स प्रभावित देशांमध्ये प्रवासाचा इतिहास आहे. त्याशिवाय ताप, डोकेदुखी, अंगदुखी, अंगावर पुरळ येणे अशी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास अशा रुग्णाला हॉस्पिटलच्या आयसोलेशन रूममध्ये किंवा घरातील वेगळ्या खोलीत ठेवण्यात येईल. रुग्णाला ट्रिपल लेयर मास्क घालावा लागेल. रुग्णाच्या अंगावरील सर्व पुरळ बरे होईपर्यंत आयसोलेश चालू राहील. यासोबतच संशयित किंवा रुग्णाचे संपर्क ट्रेसिंग केले जाईल, असंही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी म्हणजेच २० मे रोजी केंद्र सरकारने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात प्रवेश करणाऱ्या ठिकाणांवर आणि प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने विमानतळं, बंदरं यांचा समावेश होता. याशिवाय दक्षिण अफ्रिकेतून भारतात दाखल होणाऱ्या आणि ज्या प्रवाशांमध्ये या आजाराची लक्षणं दिसून येत आहेत, अशा प्रवाशांचे नमुने पुढील तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या.