Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीमान्सूनची नवी तारीख १२ जून

मान्सूनची नवी तारीख १२ जून

सध्या कर्नाटक, गोवा सीमेवर रेंगाळलाय..

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील शेतकरी आणि उष्म्यापासून हैराण झालेला सामान्य माणूस हा मान्सून कधी येणार याकडे डोळे लावून बसला होता. यंदा तो वेळेआधीच येणार असल्याच्या वृत्ताने सर्वच आनंदीत झाले होते. पण त्याचे आगमन सतत लाबणीवर पडत असल्याने लोक त्याची आतुरतेने वाट पहात आहेत. विशेष म्हणजे केरळात तीन दिवस आधीच मान्सून दाखल झाल्यानंतर, महाराष्ट्रातही तो वेळेआधीच दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. पण वेळ निघून गेल्यानंतरही अद्याप महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झालेले नाही. त्यामुळे हवामान विभाग पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहे. आता हवामान खात्याने महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा नवा मुहूर्त काढला असून तो रविवारी १२ जून रोजी दाखल होणार आहे. सध्या कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगळला असून नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या पुढील वाटचालीस अडथळे निर्माण होत आहेत. पुढील काही दिवसांत मान्सूनच्या आगमनासाठी महाराष्ट्रात पोषक हवामान तयार होईल, परिणामी १२ जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होईल, अशी नवी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रातील काही भागांत सोसाट्यांच्या वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली आहे. तर मंगळवारी मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात अंशत: ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. येत्या काही तासांत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

प्रारंभी मान्सूनची वाटचाल चांगल्याप्रकारे सुरू होती. कर्नाटकच्या बंगळुरू, चिकमंगळूर या भागापर्यंत चांगल्या पद्धतीने तो पोहोचला. सध्या तो गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. हवामान स्थिती बरोबर नसल्यामुळे मान्सूनची आगेकूच थांबली आहे. त्यामुळे ७ जून रोजी महाराष्ट्रात पोहोचणारा मान्सून आता १२ ते १५ जून दरम्यान धडकणार अशी माहिती हवामान विभागाने दिली. हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या मान्सून हा गोव्यात थबकला असून अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र नसल्यामुळे मान्सून थंडावला आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे वेगवान उष्ण वारे वाहत आहेत. त्यामुळे मान्सून क्षीण झाला आहे. पुढच्या दोन दिवसात उत्तर भारत तसेच महाराष्ट्रातील तापमान कमी होण्याची शक्यता असून त्यामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग मिळू शकतो. त्यानुसार भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार १२ ते १५ जूनच्या कालावधीत मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होण्याची दाट शक्यता आहे.

हवामान विभागाकडून चुकणारे अंदाज आणि निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेता, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. राज्यात किमान ८० ते १०० मिलीमीटर पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -