मुंबई (प्रतिनिधी): मुंबई शहरात दुचाकीवरील सह प्रवाशाला हेल्मेट सक्ती करणे हा पोलीस आयुक्तांचा निर्णय अत्यंत बालीशपणाचा आणि अन्यायकारक आहे. या निर्णयावर मुंबईकरांमध्ये संतप्त भावना आहे. हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे. निर्णय रद्द न केल्यास भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, अशी माहिती आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.
पोलीस आयुक्तांचा हा निर्णय म्हणजे ‘आजार म्हशीला आणि औषध पखाल्याला’ असे आहे. दुचाकीवर ऐनवेळी बसणा-याने हेल्मेट कोठून आणायचे?, दुचाकीमध्ये दोन हेल्मेट ठेवण्याची जागा असते का? ताशी ४० किमी पेक्षा कमी वेगात वाहन चालवले जात असताना हेल्मेटची गरज काय? असा सवाल आ. भातखळकर यांनी केला. आ. भातखळकर म्हणाले, ही हेल्मेट सक्ती त्वरित मागे घेण्यात यावी. गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष देऊन तसा निर्णय जाहीर करावा, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनास सामोरे जाण्यासाठी सज्ज रहावे, असे भातखळकर म्हणाले.