
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी तुरुंगात असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. कारण आजही न्यायालयाने तिच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. ९ दिवसांनी तिच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी १६ जूनला घेण्यात येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अटकेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे हिने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘अनेक पोलीस ठाण्यांमध्ये तकारींच्या आधारे दाखल करून घेण्यात आलेले सर्व एफआयआर बेकायदा आहेत आणि माझ्यावर झालेली अटकेची कारवाईही बेकायदा आहे’, असा दावा करत व्यक्तीस्वातंत्र्याचा भंग केल्याबद्दल नुकसानभरपाई मिळण्याची विनंतीही केतकीने याचिकेद्वारे केली आहे.
केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. केतकीने तिच्याविरोधातील दाखल गुन्हा रद्दबातल करावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या वकीलामार्फतीने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनाविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. देशमुख हे फरार होण्याची शक्यता असल्याने त्यांना जामीन देण्यात येऊ नये, असे तिने या याचिकेमध्ये म्हटले आहे. दरम्यान, केतकी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सोमवारी करण्यात आली आहे.