नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी नवीन मोहीम राबवत विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
मुंबई, पुणे, ठाणे, रायगड येथे रुग्णसंख्या वाढू लागली आहे. नाशिक जिल्हा हा पुण्याला अगदी जवळ असल्याने आपल्यालाच अधिक धोका असल्याने आतापासूनच आपण काळजी घेत आहोत. या अंतर्गत ‘हर घर दस्तक’ हे अभियान राबवित घराघरात जाऊन लसीकरणाची माहिती घेणार आहोत. ज्यांचे लसीकरण झाले नसेल, अशांचेही लसीकरण करून घेण्यासाठी प्रयत्न करू. आरोग्य विभागाचीही त्यासाठी बैठक घेणार असून, नागरिकांनीही यात स्वत: पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले.
मागील दोन्ही लाटांमध्ये नाशिक जिल्ह्यात विलंबाने दाखल झालेल्या कोरोना संसर्गाने चांगलीच उसळी घेतली होती. पण प्रशासनाच्या योग्य नियोजनाने त्यावर मात करणे शक्य झाले. आता पुन्हा राज्यात संसर्गाला सुरुवात झाली असल्यामुळे जिल्ह्यात आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करत काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. लसीकरण हेच प्रमाण त्यांनी ठरविले असून आजच्या स्थितीत जिल्ह्यातील ७४.८५ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. तर ८९ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. म्हणजे पहिला डोस घेतलेले १४ टक्के लोक हे दुसऱ्या डोससाठी पात्र झाले असतानाही त्यांचे लसीकरण झालेले नाही. याच लोकांचे आता लसीकरण करण्यासाठी प्रशासन सूक्ष्म नियोजन करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
यासाठी आरोग्य विभागाची स्वतंत्र बैठक होणार आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे लसीकरण केले जाणार आहे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचे लसीकरण करून घेण्यासाठी विशेष भर दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले.