नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धाच्या नंतर जगभरात अन्नाचा तुटवडा भासू लागला आहे. सर्वजण आपापली भूक भागवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे दोन्ही देशात तुलनेने गव्हाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यातच भारताने गव्हाची निर्यात थांबवल्यामुळे जगभरातील गव्हाच्या किंमती वाढल्या आहेत.
संयुक्त राष्ट्राची फूड एजन्सी ‘अन्न आणि कृषी संघटना’ने (एफएओ) एक अहवाल सादर केला आहे. त्यांच्या माहितीनुसार रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशात गव्हाचे उत्पादन कमी झाले. मे महिन्यात गव्हाच्या जागतिक किंमतीत ५.६ टक्क्याने वाढ झाल्याचे एफएओने सांगितले आहे. मागच्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत या किंमती ५६.२ टक्क्यांनी वाढल्या असल्याचे अहवालात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने सांगितलेल्या माहितीनुसार हल्ल्यामुळे युक्रेनमधील गव्हाचे उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गव्हाची निर्यात करणाऱ्या देशातील खराब वातावरणामुळे तेथील उत्पादनात घट झाली आहे. यादरम्यान भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे गव्हाच्या किंमती वाढत आहेत. त्याबरोबर तांदुळाच्या भावातही वारंवार वाढ होत आहेत, असा अहवाल संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने सादर केला आहे.
दरम्यान इतर धान्यांच्या किंमती मे महिन्यात त्यामानाने कमी झाल्या आहेत. परंतु गव्हाच्या किंमती वारंवार वाढत आहेत. त्याचबरोबर तयार अन्नाच्या किंमती सध्या काहीशा कमी झाल्याचे पाहायला मिळत असल्याचे एफएओच्या अहवालात म्हटले आहे.