Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

...तर मास्क सक्ती आणि निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागेल

...तर मास्क सक्ती आणि निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागेल

मुंबई : राज्यातील सध्याची कोरोना रुग्णसंख्या वाढ हे चौथ्या लाटेचेच संकेत आहेत. तूर्तास तरी मास्क सक्ती नाही, मात्र कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर मास्क सक्तीचा आणि निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागेल, असे वक्तव्य राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आठ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून दररोज एक हजाराहून अधिक कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. रविवारी राज्यात १ हजार ४९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर शनिवारी राज्यात १३५७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. शुक्रवारी ११३४, गुरुवारी १०४५ तर बुधवार १ जूनला १०८१ रुग्ण आढळले आहेत.

'दोन वर्षे शैक्षणिक नुकसानाने एक पिढी बरबाद'

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शाळा सुरु करण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. परंतु राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री यांनी मात्र १५ जूनपासून शाळा सुरु होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, "शाळा सुरु करण्याबाबत मात्र आता तरी थांबता येणार नाही. गेली दोन वर्षे शैक्षणिक नुकसानाने एक पिढी बरबाद झाली आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत जी परिस्थिती असेल ती बघून निर्णय घेता येईल."

मार्चनंतर सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद; सक्रिय रुग्णांची संख्या २५ हजार ७८२

एकीकडे एप्रिल महिन्यापासून देशातील कोरोना संसर्ग कमी होत आहे, असे दिसताना अचानक कोरोना संसर्गात सातत्याने वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत ४ हजार ५१८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मार्चनंतरची ही सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे.

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २५ हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात २५ हजार ७८२ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात आणि केरळमध्ये आहेत.

दरम्यान, देशात कोरोनाची चौथी लाट येण्याचा धोका आरोग्य तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.

Comments
Add Comment