नवी दिल्ली : गेल्या एक दशकात मोठ्या जातीय हिंसाचारापासून आपला देश मुक्त आहे, असे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सांगितले.
जग्गी वासुदेव हे नुकतेच त्यांच्या ‘माती वाचवा’ मोहिमेचा एक भाग म्हणून २७ देशांमध्ये ३० हजार किमीचा मोटरसायकल प्रवास करून भारतात परत आले आहेत. भारतात प्रार्थनास्थळांवर लोकांवर हल्ले होत आहेत, असे नुकतेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी दावा केला होता. तसेच दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून नोंदवलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर सद्गुरूंनी हे वक्तव्य केले आहे.
“मला वाटते की आपण काही गोष्टींची अतिशयोक्ती करतो. होय, काही प्रश्नं आहेत जे चर्चेत आले पाहिजेत. पण, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर खूप गरमागरम चर्चा सुरू आहे. हे वातावरण तुम्हाला रस्त्यावर कुठेही दिसत नाही. तुम्ही दिल्लीत फिरा किंवा देशातील कोणत्याही गावात, अशा प्रकारची असहिष्णुता किंवा हिंसा कुठेही दिसत नाही,” देशातील वाढत्या धार्मिक असहिष्णुतेच्या दाव्यांबद्दल विचारण्यात आल्यानंचर सद्गुरुंनी असे उत्तर दिले.
जेथे काही वादविवाद चालू आहेत ते सर्व मुद्दे कायद्याच्या कोर्टात आहेत. तुम्ही कायद्याला त्याच्या मार्गाने काम करू दिले पाहिजे. परंतु आता एकदा का तुम्हाला गती मिळाली की, लोक सगळं काही करण्यास तयार आहेत. शिवाय तुमच्या परिसरात निवडणूक किंवा काहीतरी असेल तर लोक या गोष्टी करण्यासाठी त्याचा वापर करतात,” असेही ते म्हणाले.
“मला वाटते की गेल्या २५ वर्षांत जातीय हिंसाचार लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. आम्ही जेव्हा विद्यापीठात होतो तेव्हा असे एकही वर्ष नव्हते जेव्हा देशात मोठी जातीय दंगल झाली नसेल. कुठेतरी मोठी दंगली होत होत्या. पण, मी जातीय हिंसाचाराच्या या घटना मी गेल्या ५-६ वर्षात किंवा १० वर्षात ऐकल्या नाहीत. दुर्दैवाने काही ठिकाणी काही घडलं असेल. पण, पण मोठ्या जातीय हिंसाचाराला या देशाला सामोरे जावं लागतं, हे आपण जे ऐकायचो ते आता ऐकावं लागत नाही, ही खूप सकारात्मक गोष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले.
तुम्हाला कधी भारतातील धर्मनिरपेक्षता, याबद्दलच्या प्रश्नांचा सामना करावा लागतो का, असे विचारले असता, ते म्हणाले, “काही लोक त्यांच्या स्वत:च्या हितसंबंधांसाठी यावर बोलतात. बर्याच लोकांना वाटते की भारतीय निवडणुका ही जगातील सर्वात विलक्षण गोष्ट आहे. यूएसएमध्ये, त्यांचा स्वतःच्या निवडणूक प्रणालीवर विश्वास नाही. त्यांना वाटते की त्यांची व्यवस्था ढिसाळ आहे आणि भारत उत्तम काम करत आहे. हे मी सर्वसाधारणपणे ऐकलेलं आहे. स्वत:च्या निहित स्वार्थासाठी मोठ्या आवाजात बोलणारे आणि ठाम मत असलेले काही लोक आहेत. पण सर्वसाधारणपणे मला वाटते की भारत या शब्दाचा पूर्वीपेक्षा आता अधिक आदर केला जातोय, असे ते म्हणाले.