Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यपुन्हा कोरोनाची भीती

पुन्हा कोरोनाची भीती

सीमा दाते

मुंबईत गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा कोरोनाची भीती वाढली आहे. त्यामुळे परत एकदा नागरिकांना गाफील राहून चालणार नाही. सध्या मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता दरारोज आता ५०० ते ८०० रुग्णांची नोंद होत आहे. शनिवारी ८८९ रुग्णांची नोंद झाली होती, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. सध्या मुंबईत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सध्या ४२९४ इतकी आहे, तर कोविड वाढीचा दर मात्र वाढला आहे. मुंबईत ०.०४९ टक्के झाले आहेत, तर शनिवारच्या अहवालानुसार रुग्ण दुपट्टीचा कालावधी देखील कमी झाला असून १३९६ दिवस झाला आहे. त्यामुळे सध्याची ही रुग्णवाढ गंभीर असून नागरिकांना आता गाफील राहून चालणार नाही.

सध्याची रुग्णवाढ पाहता राज्य सरकारने मास्क वापरणे बंधनकारक केले नसले तरी मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गर्दीची ठिकाणं, बस, रेल्वे यांसारख्या ठिकाणी आपल्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. काही महिन्यांपूर्वी जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट आली होती. दोनच आठवड्यात कोरोनाची रुग्णसंख्य २० हजार पार झाली होती. रोज आढळणारे मुंबईतील कोरोना रुग्ण हे २० हजार होते. मात्र कोरोना चाचण्या, उपचार आणि लसीकरणावर पालिकेने भर दिल्यामुळे मुंबई महापालिकेने तिसरी लाट यशस्वीपणे परतवून लावली होती. मात्र आता कानपूर आय. आय. टी. तज्ज्ञांनी जुलै २०२२ मध्ये कोविडची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली असल्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची भीती वाढली आहे. कोविड विषाणूच्या बाधित रुग्णांची संख्या अलीकडे वाढली आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान मुंबई महापालिकेला मात्र यासाठी पुन्हा एकदा नवीन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. एकीकडे कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता, तर दुसरीकडे मात्र पावसाळ्यातील आजार त्यामुळे पालिकेला पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणा सज्ज कराव्या लागणार आहेत. पावसाळी साथरोग आजारांसाठी वेगळे कक्ष आणि कोरोनासाठी वेगळे विलीगीकरण कक्ष त्यातच औषधांचा देखील साठा जमा करून ठेवावा लागणार आहे.

आधीच मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात भयावह परिस्थिती निर्माण होत असते. मात्र पालिकेला आता आरोग्य यंत्रणा सुसज्ज देखील ठेवावी लागणार आहे. विशेष म्हणजे पुढील एक-दोन आठवडे कोविड परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्र टास्क प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले आहे, तर कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी बाधित रुग्ण शोधून काढणे, त्यावर चाचण्या, उपचार वेळेच्या वेळेत देणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाचा उपप्रकार देखील आढळून येत आहे. त्यामुळे आधीच गंभीर स्थिती आहे.

मात्र ही परिस्थिती आणखी जास्त गंभीर होऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेतच. पण सरकारसोबत नागरिकांनी पुन्हा एकदा कोरोनाविरोधात उभं राहायला हवे. मास्क सक्ती नसली तरी स्वतःच्या संरक्षणासाठी मास्क वापरणे आणि कोरोनाची त्रिसूत्री पुन्हा एकदा सुरू करायला हवी. सध्या सगळे जीवनमान सुरळीत सुरू आहे. मात्र तरीही गाफील राहून चालणार नाही यासाठी नागरिकांनी जबाबदारी स्वीकारणे गरजेची आहे. सध्या राज्य सरकार किंवा पालिकेने कोणतेही नियम, बंधने घातलेली नाहीत. मात्र ती नको असतील तर नागरिकांनी ही सूचना पाळायला हव्यात. कोरोना ताळेबंद काळात अधिकच कडक नियम होते. ते नियम नसले तरी स्वत: दुकाने, हॉटेल, आस्थापने यांनी आपले नियम बनवून कोरोनाचा प्रसार वाढणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

पालिकेने आधीच कोरोनाचं संकट येऊ नये यासाठी रुग्णालये, जम्बो कोविड सेंटर, ऑक्सिजन, खाटा, औषध पुरवठा सगळ्यांची सोय करून ठेवली आहे. पालिकेच्या २४ वॉर्डमध्ये सुरू असलेली नियंत्रण कक्ष या सगळ्यांवर नजर ठेवून आणि नागरिकांना मदतीसाठी असणार आहेतच. त्यातच फ्रंटलाइन वर्कर, ज्येष्ठ नागरिक यांना बुस्टर डॉस देण्याच्या मोहिमा वेगाने सुरू आहेत. दुसरीकडे १५ ते १७ आणि १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण धीम्या गतीने सुरू आहे. त्यालाही वेग आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, हर घर दस्तक या मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवत आहे. त्यामुळे पालिकेचे प्रयत्न जरी असतील तरी नागरिकांनी त्याला साथ देणे आणि सुजाणपणे वागणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे भीती असली तरी गाफील राहू नका. स्वतःची स्वत: काळजी घ्या. म्हणजे चौथी लाट आल्यास तीही पालिकेला लवकर थोपवता येईल.

seemadatte@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -