Tuesday, December 3, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेरिक्षा स्टॅण्ड बंद असल्यामुळे रिक्षाचालक आक्रमक

रिक्षा स्टॅण्ड बंद असल्यामुळे रिक्षाचालक आक्रमक

कल्याण (प्रतिनिधी) : रेल्वे हद्दीतील तीस वर्षे जूना असलेला गेट नंबर २ येथील रिक्षा स्टॅण्ड रेल्वे प्रशासनाने कोरोना कालावधीपासून बंद केला आहे. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून बाहेर रिक्षा लावल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहतूक पोलीस रिक्षाचालकांकडून दंड आकारात असून रोजच्या या त्रासाला कंटाळून रिक्षाचालक संतप्त झाले आहेत. या रिक्षाचालकांनी माजी सभापती रमेश म्हात्रे यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली आहे. याबाबत लवकरच खा. डॉ. श्रीकांत शिंदे व रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन रमेश म्हात्रे यांनी या रिक्षाचालकांना दिले आहे. यावेळी विक्की म्हात्रे, जगदीश राठोड, अन्नू डोंगरे आदींसह रिक्षाचालक उपस्थित होते.

रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत सॅटीसचे काम सुरू आहे. सॅटीस काम सुरू असताना प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थासंदर्भात नियोजन व उपाययोजना केलेल्या नाहीत. महापालिका, रेल्वे, स्मार्ट सिटी, आरटीओ, वाहतूक पोलीस प्रशासन यांच्यामध्ये कोठेही समन्वय नाही. रेल्वे प्रशासनाने होम प्लॅटफॉर्म क्रमांक १ समोरील जुने रिक्षा स्टॅण्ड पर्यायी व्यवस्था न करता कोरोना कालवधीपासून बंद केले आहे. यातील दोन स्टॅण्ड सुरू केले असून गेट नंबर दोन येथील रिक्षा स्टॅण्ड अद्यापही बंदच आहे. यामुळे ४००हून अधिक रिक्षा बाहेर उभ्या कराव्या लागत आहे. येथील रिक्षा या कल्याण पूर्वेतील नेतिवली, चक्कीनाका, चेतना, नांदिवली, काका ढाबा याठिकाणी प्रवासी वाहतूक करतात.

नियोजनाअभावी स्टेशन परिसरात नित्यरोज वाहतूक खोळंबा होत आहे. दररोज वाहतूक पोलिसांकडून होणारा हजारो रुपये दंड नाहक रिक्षाचालकांना भरावा लागत आहे. रिक्षा वाहतूक हे सार्वजनिक प्रवासी व्यवस्थेचे प्रमुख घटक आहे. महापालिका, रेल्वे, स्मार्ट सिटी, आरटीओ, वाहतूक पोलीस, पोलीस प्रशासन यांची एक समन्वय समिती नेमून स्टेशन परिसरातील वाहतूक व्यवस्था व रिक्षा स्टॅण्डबाबत तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

रिक्षा, टॅक्सी चालक-मालक असोसिएशनतर्फे रिक्षाचालकांकडून दररोज दहा रुपयांची पावती घेतली जाते, गेट नंबर २ रिक्षा स्टँड आत घेण्यासाठी मदत केली जात नसल्याचा आरोप या रिक्षाचालकांनी केला आहे. याबद्दल रिक्षा, टॅक्सी चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांना विचारले असता, होम प्लॅटफॉर्म नंबर १ येथील तिन्ही रिक्षा स्टॅण्ड कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने नियोजित हॉटेल व प्रवासी प्रतीक्षागृह नवनिर्माण याकरिता कायमस्वरूपी बंद करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -