अॅड. रिया करंजकर
सर्व देशांची आज आर्थिक परिस्थिती कोरोना काळामध्ये पूर्णपणे ढासळलेली आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर अजूनही होत आहे. गरीब-श्रीमंत ही जी विषमता होती त्यात अजूननी भर पडत चाललेली आहे. याचेच परिणाम अनेक जणांचा कुटुंबावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष होऊ लागले आहेत.
रायगड जिल्हा महाड तालुक्यातमध्ये दोन दिवसांपूर्वी घडलेली घटना. हृदयाला पिळवटून टाकणारी अशी घटना. परिस्थितीमुळे माणूस एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकतो याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. सहानी नामक कुटुंबात ही घटना घडलेली. कामानिमित्त मूळ उत्तर प्रदेशातून महाड तालुक्यात हे कुटुंब आपल्या मुलाबाळांसह सोबत आलेलं होतं. पती-पत्नींचे वय तसं लहानच. पत्नी तीस वर्षांची, तर पती ३१ वर्षांचा. लहान वयात लग्न झालेलं तेही परिस्थितीमुळेच आणि या तीस वर्षांच्या मातेला पाच मुली, एक मुलगा असं कुटुंब. मोठी मुलगी दहा वर्षांची. सर्वात लहान मुलगी ही दीड वर्षांची. या एवढ्या मोठ्या कुटुंबाला पोसताना दोघा नवरा-बायकोची अक्षरश: ओढाताण होत असणार. मुलगा होईल या आशेवर अगोदरच चार मुली झाल्या. त्यांच्यानंतर मुलगा आणि परत त्याच्या पाठीवर मुलगी असा त्यांचा परिवार. सहा मुलं, दोघं नवरा-बायको पोट भरता भरता साहजिकच नवरा-बायकोची ओढाताण होत होती. रुना साहनीवर लागोपाठ आलेली बाळंतपण. मूळ गाव सोडून दुसऱ्या शहरात आलेला रुनाचा पती, जे रोजगार मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. एकटा कमावून कमावणारा तरी किती, खाणारी तोंड एवढी.
त्यामुळे नवरा-बायकोमध्ये सतत वाद होत होते. मुलाच्या आशेने मुलींना जन्म दिल्यामुळे कुटुंब वाढलेलं होतं आणि या कुटुंबाचा भार आता त्यांना पेलवत नव्हता. सर्व मुलं लहान होती तीही कमावती नव्हती. दोघं नवरा-बायको अशिक्षित असल्यामुळे चांगला रोजगार त्यांना मिळत नव्हता आणि त्यांची आर्थिक घडी ही कोरोना महामारीमध्ये बिघडलेली असल्यामुळे त्या दोघांमध्ये सतत भांडणं होत होती आणि त्या दिवशीही असंच कडाक्याचं भांडण झालं आणि त्याचा राग मनात घेऊन रूनाने नवरा कामावर गेल्यानंतर आपल्या सहा मुलांना घेऊन ती जवळच असलेल्या विहिरीपाशी गेली आणि एकापाठोपाठ एक मुलांना तिने विहिरीत ढकलून दिलं आणि स्वतःही तिने विहिरीमध्ये उडी घातली, पण गावातील लोकांनी बघितल्यावर तिला वाचवण्यात आले. पण मुलं मात्र वाचली नाहीत. आई-वडिलांच्या भांडणामुळे बिचाऱ्या निष्पाप सहा मुलांचा बळी मात्र गेला. भांडण आणि भांडणानंतर राग एवढा अनावर झाला होता की, रुनाला आपण काय करतो आहोत याचं भानच राहिलं नव्हतं. जन्म दिलेल्या आपल्या पोटचा गोळ्याचा आपण जीव घेत आहोत ही विचार करण्याची बुद्धी तिला शिल्लक राहिली नव्हती. एवढा तिचा राग अनावर झालेला होता.
या सहाही मुलांचा नेमका दोष होता तरी काय. गरीब कुटुंबात जन्म घेतला म्हणून परिस्थितीला कंटाळून जन्मदात्री आई आपला स्वतःचा मुलांचा बळी घेऊ शकते. आज तिचा जीव वाचला. पण तर सहा मुलांचा जीव मात्र गेलाय. ती स्वतःला माफ तरी करू शकेल का? हे सर्व घडलं कशामुळे आहे, तर एक अशिक्षितपणा, लहान वयात लग्न. नासमंजस्य वयात मुलांची जबाबदारी पडली. मुलगा होईल या हव्यासापोटी मुलींना जन्म देत गेल्यामुळे… या सर्व गोष्टींमुळे या सहा मुलांचा बळी गेला. एक माता कुमाता ठरली गेली. हसतंखेळतं कुटुंब एका भांडणामुळे बरबाद झालं.
(कथा सत्यघटनेवर आधारित असून नावे बदललेली आहेत)