नवऱ्याचे नाव उखाण्यातून घेण्याची पद्धत आहे, पण दािगन्यांतून नवऱ्याचे नाव कोरण्याच्या फॅशनमध्ये मंगळसूत्र, नाकातील नथ, हातावरील मेंदी, रांगोळी, टॅटूमधून नाव कोरण्याचा नवा आविष्कार तरुणाईला आकर्षित करतो आहे.
प्रियानी पाटील
सौंदर्य प्रसाधनांमध्ये आपलं नाव वापरून फॅशनचा महिमा अलीकडे जपला जाताना दिसतोय. ते स्वस्तिक जे शुभ कार्यात सर्रासपणे वापरले जात होते ते नावापुरतेच दिसून येते अलीकडे. विवाहकार्यात स्वस्तिक आवर्जून दिसायचे. शुभकार्यात रांगोळी म्हणून ते रांगोळीच्या रूपात उमटले जायचे. पण अलीकडे आपली नावं आिण फोटोमुळे स्वस्तिक हे नावापुरतेच राहिल्याचे दिसून येत आहे.
फॅशनचे नवे प्रकार पाहताना मागे वळून पाहिलं तर भाळावरील मळवट भरलेलं कुंकू ते टिकलीपर्यंतचा प्रवास सर्वांनाच ज्ञात असावा. कारण आजकाल कुंकूपेक्षा टिकलीच जास्त कपाळावर लावली जाते. जसे फॅशनचे नवे प्रकार आले तसे ते नव्या पद्धतीने अंगीकारलेही जाताहेत.
विशेषत: चित्रपटात, मालिकांमध्ये, एखाद्या जाहिरातीत फॅशनचा नवा प्रकार आला की, तो आपसुकच जनसामान्यांपर्यंत येऊन पोहोचतो आणि मग सण, समारंभात उठून दिसतो. तसं पाहिलं तर चंद्राची फॅशन आवडलीच बहुतेकांना… ब्लाऊजच्या मागे स्वत:चं नाव प्रिंट करून तो साडीवर परिधान करून वेगळी फॅशन आली. असं काही तरी वेगळं करताना मेहनत असली तरी तो लूक चारचौघांत, पार्टी-समारंभात उठून दिसतो तो वेगळा.
ब्लाऊजच्या अनेक फॅशनमध्ये आपलं नाव प्रिंट करून घेण्याची ही नवी फॅशन निश्चितच महिलावर्गात आवडीची ठरली आहे. केवळ महिलाच नाही तर लहान मुलींना देखील याचे आकर्षण आहे. टिकलीच्या फॅशनमध्ये विविध डिझाइन्स आपल्याला दिसून येतात. नव्या रंगाच्या डिझाइन्सच्या टिकल्यांमध्ये विशेषत: सौभाग्याचं लेणं लाल, मरून रंगाची टिकली ही विशेषत: मुली महिलांमध्ये लोकप्रिय अाहे. त्याचप्रमाणे चंद्रकोरीची टिकलीही विशेषत: साडीवर शोभून दिसते. यामध्ये डायमंडचाही वापर अधिक होताना दिसून येतो.
हातावरील मेंदीमध्ये विवाहकार्यात वधूच्या हातावर वराचं नाव कोरलं जातं. रंगात नावं रंगतात. फोटो, व्हीडिओच्या रूपाने आठवणीच्या अल्बममध्ये राहतात. मंगळसूत्राच्या अनेक डिझाइन्सची रूपं महिलावर्गाला आकर्षित करतात. नवनव्या डिझाइन्सचे प्रकार उपलब्ध असलेले दिसून येतात. मंगळसूत्राच्या वाट्या, पानाच्या डिझाइन्स आणि त्यातही नवरा-नवरीचे कोरण्यात येणारे नाव किंवा मग त्यांचे फोटो हे लुभावणारे ठरतात. पेंडंटमध्ये फोटोचा वापर केला जातो.
अलीकडे विवाहकार्यात वधू-वरांचे फोटोचे बॅनर हॉलच्या प्रथमदर्शनी पाहायला मिळतात. गेल्या दशकात वधू-वराचे नावांच्या फॅशनमध्ये ही नवी कलाटणी आहे. रांगोळीचा नवा आविष्कार न्याहाळताना अलीकडे वधू-वरांचे फोटो डिजिटल रांगोळीच्या माध्यमातून साकारले जातात. या रांगोळ्या जिवंत अनुभूती देऊन जातात.
मंगळसूत्र अलीकडे गळ्यापेक्षा हातात सजताना दिसते. काळ्या मण्यांचे ब्रेसलेट बनवून ते हातात घातलं की गळ्यात पाहिजेच, असा अट्टहास दिसून येत नाही. आपलं नाव फॅशनच्या रूपात अलीकडे विविध दागिन्यांवर कोरलेलं दिसून येते. किंवा वराचं नाव कोरलेले दिसून येते. नाकातील नथीमध्येही मुलाचं नाव, आपलं नाव कोरलं जातं. यामुळे नवा आविष्कार दिसून येतो. नवी फॅशन तरुणाईला आकर्षित करते खरं तर. नावाच्या फॅशन अनुभवताना टॅटूच्या माध्यमातूनही आपलं किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव हातावर कोरलं जातं.
कपडे, दागिने, टॅटू, रांगोळ्या, टिकल्या, अंगठी, मंगळसूत्र अशा अनेक वस्तू अाहेत की, ज्या नवनव्या डिझाइन्समध्ये प्रत्येकाला हव्या असतात. जुन्या फॅशनपेक्षा नव्याचा अंगीकार अलीकडे सर्रासपणे केला जातो. पण नव्याचा स्रोत जपताना विशेषत: आपल्या संस्कृतीचा विसर पडून चालणार नाही. त्यासाठी आपल्या संस्कृतीचा ठेवाही जतन करून ठेवणे गरजेचे आहे.