श्रीनिवास बेलसरे
मोहन सहगल यांच्या ‘देवर’चे (१९६६) एक वैशिष्ट्य होते. या सिनेमात विनोदी अभिनेते देवेन वर्मा यांनी आयुष्यातली एकमेव नकारात्मक भूमिका केली होती. सिनेमात त्या काळचे अनेक यशस्वी कलाकार होतेच. धर्मेंद्र, शर्मिला या लोकप्रिय जोडीबरोबर शशिकला जवळकर, दुर्गा खोटे, धुमाळ, सुलोचना लाटकर, तरुण बोस, डी. जे. सप्रू, बेला बोस असे कलाकार एकत्र आले होते.
‘देवर’ची कथा ‘ज्ञानपीठ’ विजेते लेखक आणि स्वातंत्र्यसेनानी पद्मभूषण ताराशंकर बंडोपाध्याय यांच्या ‘ना’ नावाच्या लघुकथेवर आधारलेली होती. बंगालीत ‘ना’ या नावानेच हा सिनेमा १९५४ ला आला होता. याच कथेवर बेतलेला ‘पडीतल मत्तम पोधुमा’ १९६२ला तामिळमध्येही येऊन गेला. कथा होती बालपणीच्या प्रेमकथेची तारुण्यातील शोकांतिका!
आज ज्यांचे वय ४०पेक्षा अधिक आहे, त्या बहुतेकांना देवरमधील एक गाणे नक्कीच आवडते. मुकेशचा नितळ, निरागस आवाज, रोशनचे सुरेल संगीत, त्यात त्यांनी निवडलेला भैरवी रागाचा महिमा आणि आनंद बक्षीजींचे हृदयाला थेट भिडणारे साधे सरल हिंदी शब्द कुणालाही चटकन कित्येक वर्षे मागे घेऊन जातात. तशी सर्व गाणी लोकप्रिय झाली. मुकेशने गायलेले ‘बहारोने मेरा चमन लुटकर…’ आणि लतादीदींच्या आवाजातले ‘दुनियामें ऐसा कहां सबका नसीब है?’ तर आजही हिटच.
‘आया हैं मुझे फिर याद…’ मात्र कायमच समकालीन ठरते. सर्वच पिढ्यांना त्यात आपला भूतकाळ दिसतो. त्या आठवणी अस्वस्थही करतात आणि आनंदही देतात. प्रत्येकाला या गाण्यात लहानपणातली निरागसता, यौवनातली मस्ती पुन्हा अनुभवता येते.
सिनेसृष्टीत खूप आधीच्या गीतकारांना ४/५ कडवी लिहायला मिळत. त्यामुळे एखाद्या प्रसंगाच्या अनेक बाजू दाखवून श्रोत्यांना एखाद्या मूडमध्ये नेणे सोपे जाई. नंतरच्या काळात दोन किंवा तीन कडव्यातच सगळा आशय बसवावा लागे. आनंद बक्षीजी हे त्यातले तज्ज्ञच! ते कोणताही प्रसंग २/३ कडव्यातसुद्धा खुलवत. सगळे लहानपण, तेव्हाची एखादी अबोध प्रेमकथा, निरागस मैत्री, ताटातूट, त्यानंतर त्या काळातील प्रियजनांबद्दलची कायमची हुरहूर हे सगळे आनंदजींनी ३ कडव्यात बसवले आहे.
शंकर (धर्मेंद्र) शांताच्या (शशिकला), म्हणजे त्याच्या वाग्दत्त वधूच्या घरी गेलेला असतो. तिला आई-वडिलांनी केलेली ही निवड मान्य नसते. आईने त्याला चहा देण्यास सांगितल्यावर ती आईशी जे उद्धटपणे बोलते ते ऐकून धर्मेंद्र तिथून निघून जातो. चुलत भावाच्या (देवेन वर्मा) लग्नासंदर्भात जमलेल्या पाहुण्यांच्या बैठकीत शंकरला गायचा आग्रह होतो आणि तो हे गाणे म्हणतो.
त्याला खरे तर त्याची लहानपणातील जीवलग मैत्रीण भंवरिया (शर्मिला टागोर)ची आठवण येत असते. ती जुन्या सिनेमातील परंपरेप्रमाणे “बिछडलेली” असते आणि आता जिच्याशी लग्न होणार, तिला आपण पसंत नाही हे कळल्याने अतिशय हळव्या मूडमध्ये धर्मेंद्र हे गाणे गातो –
आया हैं मुझे फिर याद वो जालिम,
गुजरा जमाना बचपन का…
हाय रे अकेले छोड़के जाना,
और ना आना बचपनका…
आया है मुझे फिर याद…
लहानपणची ती निर्मळ आनंदाची अवस्था, ती निरागस मनोवृत्ती आता कायमची सोडून गेली. नव्या व्यवहारी जगात ती पुन्हा कधीही परत येऊ शकत नाही, ही जाणीव अनेकदा अस्वस्थ करते. तीच पुनर्भेटीच्या अशक्यतेची जीवघेणी जाणीव आनंद बक्षींनी दोन बोटात पकडली आहे. ती अस्वस्थ वेदना अलगद कागदावर उतरवली! किती निवडक शब्दांत ते बालपणीच्या भाबड्या भावनांचे चित्रणकरतात पाहा –
वो खेल, वो साथी, वो झुले,
वो दौड़ के कहना ‘आ छू ले!’
हम आजतलक भी ना भुले,
वो ख्वाब सुहाना बचपनका
आया हैं मुझे…
एकाने अचानक, काही न सांगता, पळत सुटायचे आणि जोडीदाराला पळता पळता, खोडकर आव्हान द्यायचे, ‘ये धर मला, धर!’ या एका ओळीत कवीने सगळे बालपण गच्च दाबून बसवून टाकले!
कवी म्हणतो, हे काही सगळ्यांचेच होते असे नाही. लहानपणची मैत्री, तारुण्याच्या सुरुवातीचे अबोध प्रेम अनेकजण सहज विसरून जातात. पण ज्यांनी त्या ‘दिलकी लगी’चा उत्कट अनुभव घेतलेला असतो, त्यांच्या मनात मात्र त्या आठवणी आयुष्यभर घर करून राहतात. मनात वेदनेची एक बोच सतत आत कुठेतरी गुणगुणत राहते.
इसकी सबको पहचान नहीं,
ये दो दिनका मेहमान नहीं,
मुश्कील हैं बहुत, आसान नहीं,
ये प्यार भुलाना बचपन का!
आया हैं मुझे फिर याद…
आणि अशात जर त्या काळातील एखादा जवळचा मित्र, एखादा सवंगडी, कधी ती प्रियाच भेटली तर? तर काय? आता तर सगळे आयुष्य हातातून गेलेलेच असते! मग क्षणभर बरोबर बसून दोन अश्रू ढाळायचे, नियतीचे गाऱ्हाणे गायचे आणि सोडून द्यायचे, इतकेच ना? पण निदान तेवढे दु:ख आणि सुख वाटून घ्यायला तो जुना जीवलग भेटला तर पाहिजे!
मिलकर रोये फ़रियाद करें,
उन बिते दिनोंकी याद करें,
ऐ काश कहीं मिल जाये कोई,
वो मीत पुराना बचपनका…
आया हैं मुझे फिर याद…
गेल्या काही दशकांत नुसती एक पिढी गेली आणि दुसरी आली असे घडलेले नाही. सगळ्याच गोष्टी-जुने जग, जुन्या भावना, श्रद्धा, जीवनमूल्ये, सगळे सगळे बदलून गेले आहे. माणसे, त्यांची मनोवृत्ती या सगळ्यात इतका आमूलाग्र बदल झाला आहे की, हे गाणे ऐकताना जुन्या आठवणींनी सहसा होतो तसा फक्त आनंदच होतो असे नाही. त्या आनंदाबरोबर एक जीवघेणे दु:खही अनुभवावे लागते.