सोनूचा मित्र!

  85

रमेश तांबे


एके दिवशी सोनूचं घरात झालं भांडण. आईसोबत, बाबांबरोबर. ताईने तर मारलेच खरोखर... मग सोनू बसला रुसून. माळ्यावरती बसला लपून! दुपार गेली, संध्याकाळ झाली. सोनूची आठवण कुणा नाही आली. तिकडे सोनू माळ्यावर होता रडत, डोळ्यांतून एक एक थेंब होता पडत. रडता रडता म्हणत होता, “माझा काय उपयोग? सारेच माझा राग राग करतात. रोजच मला सारे ओरडतात.”


मग पुढे काय, तर नवलच घडले. तिथे अचानक एक भूतच आले. भुताला बघताच सोनू घाबरला खूप! भूत म्हणाले, “आवाज करू नको चूप!” सोनू होता थरथरत, भूत होते त्याला हसत. भूत म्हणाले, “अरे सोनूबाळा वेडा आहेस का खुळा! मी तर तुझा मित्र, फिरत असतो सर्वत्र. सांग मला काय झाले तुला. असा माळ्यावरती तू का लपला?”


सोनू म्हणाला, “काय सांगू भुता माझी कहाणी तुला. कुठलीच गोष्ट मी नीट नाही करत, दहा दहा वेळा करावी लागते परत. सगळे म्हणतात, “सोनू तू तर एक नंबरचा ढ.” सगळे करतात माझा अपमान, कधीच नसतो मला सन्मान! भुता भुता खरेच का रे मी असा? भित्रा आणि मठ्ठ!” भूत म्हणाले, “नाही रे सोनू, तूदेखील एक चांगला हुशार, शहाणा आणि धाडसी मुलगा आहेस. तुला मी थोडी हिम्मत देतो आणि थोडी ताकद देतो. चल उठ झटक निराशा, चांगलेच होईन ठेव मनात आशा!”


भूत म्हणाले, “सोनू आता आपण एक गंमत करू. तू फक्त हातात ही छडी धर. मग तू कुणालाच दिसणार नाही.” सोनूने हातात छडी धरली अन् काय आश्चर्य सोनू स्वतःलाच दिसेनासा झाला. मग सोनू निघाला भुतासोबत तरंगत, घरात बसली होती पंगत. ताईच्या ताटात होती जिलेबी, सोनू आणि भुताने पळवली सर्व! ताई म्हणाली, “माझी जिलेबी कुणी घेतली?” बाबा म्हणाले, “तूच हावऱ्यासारखी खाल्ली असणार!” मग सोनूने बाबांच्या ताटात वाढले पंचवीस लाडू, आई म्हणाली, “अहो असे काय करता? एक एक खा ना लाडू!” तसे बाबा म्हणाले, “मी नाही घेतले, ताईनेच ठेवले असतील गूपचूप.”


शाळेची वेळ होताच, भुतासोबत सोनू गेला शाळेत. मग काय पुढे घडली मज्जाच मज्जा! सायकल चालवली खूपच जोरात, टवाळ पोरांना लोळवले मैदानात. नारळाच्या झाडावर चढला सरसर, सोडवली वर्गात गणिते भरभर, भूगोलाच्या तासाला प्राण्यांचे आवाज काढले, इतिहासाच्या वेळी ढाल तलवारीचे आवाज आले. गुरुजी तर आश्चर्यानेच बघू लागले. इंग्रजी तर सोनू असा काही बोलला, सारा वर्गच अचंबित झाला. प्रत्येक विषयात सोनूने मारली बाजी, सारी मुले म्हणाली, सोनू वाह जी! गुंड पोरांनी सोनूला केला सलाम, मग सोनू म्हणाला, “मला जरा करू द्या आराम!”


घरी परत येताना सोनू होता खूपच खूश, भुताला म्हणाला “रोज माझ्यासोबत ये तूच! आपण दोघे करू खूप धमाल, सारेच म्हणतील सोनूची आहे कमाल!” पण भूत म्हणाले, “सोनू वेड्यासारखा विचार करू नको. खरेतर कुणीच ‘ढ’ नसतं बरं! फक्त आत्मविश्वास असतो कमी. आज तो मी तुला दिला भरपूर. आता घाबरायचं नाही. बिनधास्त भिडायचं. प्रत्येक गोष्ट करायची. सगळ्या स्पर्धेत भाग घ्यायचा. स्वतःला कमी नाही समजायचं. तुला हिम्मत हवी होती ती मी तुला दिली. आता मी निघतो. तुझ्यासारखे अनेक सोनू वाट पाहत आहेत माझी!” मग सोनूने मोठ्या आत्मविश्वासानं भुताला निरोप दिला! त्यानंतर सोनू पूर्ण बदलून गेला. सोनूचे हे नवे रूप सगळ्यांनाच आवडले खूप!

Comments
Add Comment

नौदलात थेट भरती

करिअर : सुरेश वांदिले भारतीय नौदलामार्फत १०+२ (बी. टेक) कॅडेट एन्ट्री स्किम (योजना) राबवली जाते. यासाठी मुलांसोबत

‘वंदे भारत‌’मुळे नव्या काश्मीरची उभारणी

विशेष : प्रा. सुखदेव बखळे कतरा ते श्रीनगर या ‌‘वंदे भारत एक्स्प्रेस‌’ला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवणे हे केवळ

मुले मोठी होताना...

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू टीनएजर्सना वाढवणं जेवढं कठीण तेवढेच टीनएजर होणंही अवघड. असं का बरं? कारण आपल्या

आषाढ घन

माेरपीस : पूजा काळे किती तरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो किती तरी दिवसांत नाही नदीत डुंबलो... खुल्या चांदण्याची

सोशल मीडिया आणि वैवाहिक जीवन

आरती बनसोडे (मानसिक समुपदेशक, मुंबई ) पूर्वीचा काळ आणि हल्लीचा काळ यामध्ये मोठा बदल झाला आहे तो म्हणजे वाढत्या

ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांची ओळख ज्योतिषी, पंचागंकर्ते आणि धर्मशास्त्राचे गाढे