सुकृत खांडेकर
राज्यसभेत रिक्त होणाऱ्या सत्तावन्न जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होणार असून देशातील पंधरा राज्यांतील विधानसभेचे आमदार मतदानाचा हक्क बजावतील. उत्तर प्रदेशातून राज्यसभेच्या अकरा जागांसाठी मतदान होईल, तर महाराष्ट्र व तामिळनाडूतून प्रत्येकी सहा जागा निवडून देण्यासाठी आमदार मतदान करतील. राज्यसभेसाठी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेले उमेदवार हा या वर्षी मोठा वादाचा विषय बनला आहे. राज्यसभेसाठी काँग्रेसच्या मुख्यालयातून उमेदवारांची घोषणा झाली आणि राज्याराज्यांत पक्षसंघटनेत असंतोषाच्या ठिणग्या उडू लागल्या. एकशे अडतीस वर्षांची मोठी परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाची सत्ता गांधी परिवाराच्या हाती केंद्रित आहे. सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष आहेत, त्यांचा पुत्र राहुल आणि कन्या प्रियंका यांच्याकडे पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार एकवटले आहेत. गांधी परिवाराच्या विरोधात बोलतील त्यांना पक्षात बाजूला टाकले जाते. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर निवडून जाणे हे अधिक सोयीचे व सुरक्षित वाटते. ज्यांच्याकडे निवडणूक लढविण्यासाठी करोडो रुपयांची तजबीज नाही, कार्यकर्त्यांचे केडर नाही किंवा ज्यांच्याकडे जनाधार नाही असे नेते लोकसभेऐवजी राज्यसभेत खासदार किंवा विधानसभेऐवजी विधान परिषदेत आमदार म्हणून जाण्यासाठी उत्सुक असतात. ज्यांनी पक्षाची वर्षांनुवर्षे सेवा केली, पक्षाशी निष्ठावान राहिले ते मागल्या दाराने संसदेत जाण्यासाठी आतुर असतात. अर्थात त्यांची उमेदवारी ही पक्षश्रेष्ठींच्या मर्जीवर अवलंबून असते. काँग्रेसमध्ये पक्षसेवा, निष्ठा किंवा जनाधार या निकषांना काहीही अर्थ उरलेला नाही.
जो गांधी परिवाराशी निकटचा असेल त्याच्या नावावर उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब होते. महाराष्ट्रात काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. राज्यात भाजप नंबर १ आहे. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यानंतर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. सरकारमध्ये सहभाग ही काँग्रेसला राज्यात लागलेली लॉटरी आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेसचा केवळ एकच उमेदवार राज्यसभेवर निवडून येऊ शकतो. अशा वेळी पक्षाचा उमेदवार म्हणून राज्यातील नेत्यांचा विचार होणे अपेक्षित होते. पण कोण कुठला प्रतापगढी काँग्रेसने महाराष्ट्रावर उमेदवार लादला त्याच्या विरोधात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी अध्यक्ष व मंत्री असलेले बाळासाहेब थोरात किंवा अशोक चव्हाण एक चकार शब्द बोलत नाहीत. पण ते अवाक्षर काढत नाहीत म्हणजे पक्षात सारे काही अलबेल आहे, असे मुळीच नाही. शायरी करणारा इमरान प्रतापगढी याचे नाव प्रथमच महाराष्ट्राला कळले, पक्ष संघटना मजबूत करण्याचे त्याच्याकडे कसब असते, तर उत्तर प्रदेशात काँग्रेसचे पानीपत झाले नसते. ते स्वत: मुरादाबादमध्ये काही लाख मतांनी २०१९ मध्ये पराभूत झाले, त्यांचे डिपॉझिट जप्त झाले, अशा पराभूत प्रतापगढीला सोनिया गांधींनी महाराष्ट्रावर का लादले? एकदा हा माणूस राज्यसभेवर निवडून गेला की, त्याचा महाराष्ट्राला काहीही उपयोग होणार नाही, त्याला महाराष्ट्राचा इतिहास-भूगोल कसा आहे हेही ठाऊक नाही. यापूर्वीही काँग्रेसने महाराष्ट्रावर अनेक उपरे लादले. गुलाम नबी आजाद, राजीव शुक्लासारख्यांना संसदेत पाठवले. केंद्रात ते मंत्रीही झाले, पण त्यांचा कोणताही लाभ पक्षाला किंवा महाराष्ट्राला झाला नाही.
राज्यसभेत एकूण खासदारांची संख्या २४५ आहे. त्यात सध्या भाजपचे १०१ आहेत. काँग्रेसचे २९, तृणमूल काँग्रेसचे १३, आपचे ८, द्रमुकचे १० व इतर ८४ आहेत. राज्यसभेत सर्वात जास्त खासदार उत्तर प्रदेशातून म्हणजे ३१ जण निवडून येतात. अरुणाचल प्रदेश, गोवा, त्रिपुरा, नागालँड, पुडुचेरी, मिझोरम, सिक्कीम या राज्यांतून प्रत्येकी एक खासदार राज्यसभेवर जातो.
राज्यसभेचे सभापती हे उपराष्ट्रपती असतात. लोकसभेत काँग्रेसचे त्रेपन्न खासदार आहेत. लोकसभेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळविण्याइतपतही काँग्रेसला गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत खासदार जिंकून आणता आले नाहीत. देशात काँग्रेसची दारुण परिस्थिती असताना राज्यसभा निवडणुकीसाठी उपरे उमेदवार लादण्याचा खेळ गांधी परिवाराने का खेळावा?
पी. चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे, संजय राऊत, डॉ. विकास महात्मे हे महाराष्ट्रातून निवडून गेलेले सदस्य या वर्षी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. पटेल, गोयल व राऊत यांना अनुक्रमे, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेने महाराष्ट्रातून पुन्हा उमेदवारी दिली आहे. पी. चिदंबरम यांना काँग्रेसने यावेळी तामिळनाडूतून उमेदवारी दिली आहे. अभिनेत्री नगमा या २००३-०४ मध्ये काँग्रेसमध्ये आल्या, तेव्हाच सोनिया गांधींनी त्यांना राज्यसभेवर पाठविण्याचे आश्वासन दिले होते. अठरा वर्षे झाली तरी त्यांना दिलेला शब्द पाळला गेला नाही, असे त्यांनीच ट्वीट केले. महाराष्ट्रातून सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, अनंतराव गाडगीळ अशा कोणाचीच प्रतापगढीपुढे हायकमांडला आठवण झाली नाही, हे पक्षाचे दुर्दैव आहे. राजस्थानात काँग्रसचे सरकार आहे. पण राज्यसभेसाठी काँग्रेसने तीनही उमदेवार राज्याबाहेरचे दिले म्हणून तिथे मोठी खदखद आहे. रणदीपसिंह सुरजेवाला, मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी यांचा राजस्थानशी काय संबंध? सुरजेवाला हे हरियाणाचे, वासनिक महाराष्ट्राचे, तर तिवारी हे उत्तर प्रदेशचे. उत्तर प्रदेशात तर काँग्रेसचे पानीपतच झाले आहे, तर वासनिक व सुरजेवाला यांना त्यांच्या राज्यात कोणी विचारत नाही.
राजस्थानात काँग्रेसने हरियाणा, महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमधील उमेदवार लादले. महाराष्ट्रावर उत्तर प्रदेशचे ओझे टाकले. छत्तीसगढ हा तर आदिवासी प्रदेश, पण तेथेही स्थानिक उमेदवार न देता, एक उत्तर प्रदेशचा व दुसरा बिहारचा दिला. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने राजीव शुक्ला व रंजीत रंजन या उपऱ्यांना उमेदवारी देऊन तेथील काँग्रेसचे पंखच छाटून टाकलेत. उत्तर प्रदेशात ज्यांच्यामुळे काँग्रेसचा सुफडा साफ झाला, ते राजीव शुक्ला, इम्रान प्रतापगढी व प्रमोद तिवारी हे अन्य राज्यातून राज्यसभेत खासदार म्हणून मिरवणार आहेत. कीर्ती हा खासदार असताना त्याच्या पिताश्रींना पी. चिदंबरमना पुन्हा उमेदवारी का दिली? कन्या आमदार असताना प्रमोद तिवारींना राज्यसभा कशासाठी? दोन वेळा पराभूत झालेल्या सुरजेवालांना परप्रांतातून राज्यसभेत पाठविण्याचा अट्टहास कशासाठी? महाराष्ट्रात सहा जागांसाठी सात उमेदवार आणि राजस्थानातही शेवटच्या क्षणी टीव्ही सम्राट सुभाषचंद्रा यांनी दाखल केलेला अर्ज यामुळे सर्वच गणिते फिस्कटली आहेत. कर्नाटकातही काँग्रेसने दुसरा उमेदवार मुस्लीम उभा करून जुगार खेळला आहे. जी २३ मधील गुलाम नबी आजाद व आनंद शर्मा यांना मात्र गांधी परिवाराने कटाक्षाने दूर ठेवले आहे.