Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरप्रकल्पाला विरोध करणारे श्रेय लाटण्यासाठी पुढे पुढे करत आहेत - मनीषा चौधरी

प्रकल्पाला विरोध करणारे श्रेय लाटण्यासाठी पुढे पुढे करत आहेत – मनीषा चौधरी

मविआ सरकारवर टीका

बोईसर (वार्ताहर) : वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांना राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना विरोध करत होते पण आज हेच या प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी पुढे करत असल्याचे चित्र आहे, असे विधान दहिसर विधानसभेच्या आमदार मनीषा चौधरी यांनी पालघर येथे पत्रकार परिषदेत केले.

अजित पवार यांनी वाढवण बंदराविषयी डहाणू येथे सूचक वक्तव्य केले होते. काल त्यांनी बुलेट ट्रेनविषयीसुद्धा सकारात्मक असल्याचे एका वृत्त संस्थेला सांगितले होते. त्यावर आमदार मनीषा चौधरी यांनी वरील विधान केले. पालघर येथील शासकीय विश्रामगृहात केंद्र सरकारच्या आठ वर्षाच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालघर शहर भाजपाध्यक्ष तेजराज सिंह हजारी, पुंडलिक भानुशाली इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सातपाटी बंदराचा विकास व्हावा. तिथल्या मच्छिमारांना नवीन आधुनिक सुविधा प्राप्त व्हाव्यात. यासाठी केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून सातपाटी येथे हार्बर बंदर उभारणीसाठी निधी आला होता. पण आजतागायत या बंदराचे काम हाती घेण्यात आले नाही. राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे आलेले पैसे परत गेल्याचा आरोप चौधरी यांनी केला. राज्यात ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. या मार्गात ६५ खाड्या असून त्यातील गाळ काढण्यासाठी केंद्र व राज्य यांनी एकत्रित काम करायचे होते. पण राज्य सरकार या कामासाठी सकारात्मकता दाखवणे अपेक्षित असताना त्यांची भूमिका या कामाच्या विरोधातच आहे, असे चौधरी यांनी सांगितले.

थर्मल पॉवरमुळे बागायतदारांच्या फळ पिकांवर फरक पडला आहे. प्रदूषणाचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. पालघर जिल्ह्यात वीज तयार होते. पाणीसुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तरीपण आपल्याकडील लोकांना अंधारात राहावे लागते. ग्रामीण भागामध्ये मैलोन्मैल पायी प्रवास करून महिलांना डोक्यावर हंडे भरून पाण्यासाठी पायपीट करावी लागल्याचे चित्र जिल्ह्यामध्ये पाहत आहोत.

जयंत पाटील येथे आले असताना पूर्वेचे पाणी पश्चिमेला देऊ असे आश्वासन त्यांनी लोकांना दिले होते. मात्र आजतागायत काहीच झाले नाही. फुटलेल्या नारळाएवढे पाणीसुद्धा पश्चिमेला आले नाही, असा टोला चौधरी यांनी हाणला. पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या काळातले, हॉस्पिटलचे भूमिपूजनसुद्धा फडणवीस यांनी केले होते. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या काळात पालघर जिल्ह्यातील रस्त्यासाठी केंद्राकडून ३६०० कोटी देण्यात आले होते. पूल फ्लाय ओव्हरची कामे जी सुरू आहे ती केंद्राच्या पैशानेच सुरू आहेत, असेही चौधरी यांनी सांगितले.

मी दहिसर विधानसभेची आमदार जरी असले तरी मी पालघर जिल्ह्याची भूमिपुत्र आहे. इथल्या प्रश्नांविषयी मी रात्री उशिरापर्यंत विधानसभेत थांबते व इथल्या भागातील विविध समस्या सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करते, असा टोला त्यांनी अप्रत्यक्षरित्या स्थानिक आमदारांना लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -