Sunday, August 24, 2025

नालेसफाईबाबतचा महापालिकेचा दावा फोल

नालेसफाईबाबतचा महापालिकेचा दावा फोल

विरार (वार्ताहर) : शहरातील नालेसफाईबाबत वसई-विरार महापालिका प्रशासन उदासीन आहे. पालिका प्रशासन ८०-९० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याची खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करीत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष वितेंद्र पाटील यांनी सांगितले. आपल्या सहकाऱ्यांना घेऊन वितेंद्र पाटील हे नालासोपारा पश्चिम येथील फन फियेस्टाजवळील मुख्य नाल्यात उतरले.

तसेच त्यांनी पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनासुद्धा नाल्यात उतरण्यास भाग पाडले. येथील नाला वीस फूट रुंद असताना काही विकासकांनी आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी भरणी करून अर्ध्यापेक्षा जास्त नाला बुजवला आहे. त्याची रुंदी जेमतेम आठ फूट झाली आहे. त्यामुळे येथील इमारतींमधील दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरून सामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होते.

स्थानिक माजी नगरसेवक बेफिकीर आहेत. पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार, पाठपुरावा करून देखील नालेसफाईच्या समस्येकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. पालिकेने नालेसफाई केल्याची चिन्हे दिसत नाहीत. अस्वच्छतेमुळे परिसरात रोगराई पसरून मोठी जीवितहानी होण्याचा धोका आहे. नालेसफाईच्या कामात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. मनसेकडे नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत होत्या. त्या अानुषंगाने नाल्यात उतरण्याचा निर्णय घेऊन नालेसफाईबाबतची पाहणी केली. यामुळे महापालिकेचा नालेसफाई केल्याचा दावा फोल ठरला असल्याचे वितेंद्र पाटील यांनी सांगतले.

Comments
Add Comment