
पटसंख्या घसरली, अध्यापनात अडचणी
विक्रमगड : कोरोना काळात शाळा बंद असल्याने शिक्षणाची तूट भरून काढण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागावर आहे. विक्रमगड तालुक्यात ७८२ मंजूर पदांपैकी तब्बल १९७ पदे रिक्त असून शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्याही घसरत आहे तसेच शिक्षणाचा दर्जाही कमी होतो आहे.
विक्रमगड तालुक्यात शिक्षण विभागातील रिक्त पदांमुळे अध्यापनात अडचणी येत आहेत. याचा सामना शिक्षक, अधिकारी व विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या २३५ शाळा असून त्यात साधारण १६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तालुक्यात ७८२ मंजूर पदांपैकी तब्बल १९७ पदे रिक्त आहेत. ३५ मुख्याध्यापक पदापैकी २२ पदे रिक्त असून केंद्रप्रमुखांच्या १६ पदांपैकी ९ पदे रिक्त आहेत.
विस्ताराधिकारी ही सात पदे मंजूर असून त्यातील केवळ एक पद भरले असून सहा पदे रिक्त आहेत. पदवीधर शिक्षकांची ८२, सहशिक्षकांची ७७ पदे रिक्त आहेत. हा शिक्षण विभागाचा कारभार रामभरोसे चालतो का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ही पदे लवकरात लवकर भरावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपुऱ्या शिक्षकांमुळे पटसंख्याही कमी होत आहे. दर्जा वाढविण्यासाठी पूर्णवेळ शिक्षक देणे अपेक्षित आहे, असे येथील किरण गहला यांचे मत आहे. तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्याससंबंधी वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी ईश्वर पवार यांनी दिली.