मुंबई (प्रतिनिधी) : राजकारणात जसे जनसामान्यांवर अन्याय अत्याचार केले जात आहेत तसेच ते कामगार क्षेत्रावरसुद्धा होत आहेत. म्हणूनच भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाला राम राम करत ‘लाइफस्टाइल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड’मधील सर्व कामगारांनी महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे झेंडा हाती घेतला आहे.
शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेनाच केवळ कामगारांना होणाऱ्या त्रासाला कारणीभूत असून भारतीय कामगार सेना ही कामगारांसाठी कमी आणि मालकाची मर्जी राखण्याकरता जास्त काम करते हे सर्व कामगारांच्या तोंडून ऐकावयास मिळत होते. त्यामुळेच चार जून रोजी महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा विद्यमान आमदार नितेश नारायणराव राणे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह कुर्लास्थित फिनिक्स मॉलमधील लाइफस्टाइलप्रणित मॅक्स शो रूममधील कामगारांची आणि व्यवस्थापनाची शनिवारी भेट घेतली.
‘भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी तसेच त्यांच्या अंतर्गत युनिटमधील काही कामगार वर्गास हाताशी धरून महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे सदस्यत्व झुगारून पुन्हा भारतीय कामगार सेनेमध्ये येण्याकरिता कामगारांवर व युनिट कमिटी सदस्यांवर भारतीय कामगार सेनेकडून दबाव टाकला जात होता; परंतु कामगारांनी या दडपशाहीला झुगारून महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेवर अखंड विश्वास दाखवला. त्या विश्वासास पात्र असे पगारवाढीचे करार आम्ही इतर आस्थापनांमध्ये जसे केले आहेत तसे आपल्यालाही करून देण्यास कटिबद्ध आहोत’, असे आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रवीण नलावडे, भारतीय जनता पक्ष कार्यकारिणी सदस्य विजय घरत, महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे खजिनदार, कार्यालय प्रमुख राजा गावडे, मॅक्स लाइफस्टाइल कंपनीचे कमिटी सदस्य अंकेश गुप्ता मकरंद पारकर व कट्टर राणे समर्थक अमोल शिंदे आणि इतर समिती सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी सर्व कामगारांच्या वतीने आमदार नितेश राणे आणि सरचिटणीस प्रवीण नलावडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कामगारांमध्ये नितेश राणे यांच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण होते.