Sunday, March 23, 2025
Homeमहत्वाची बातमीजलद लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’

जलद लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’

महापालिकेकडून १२ ते १७ वयोगटाला प्राधान्य

मुंबई (प्रतिनिधी) : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी विशेषतः १२ ते १४ आणि १५ ते १७ वर्ष वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी मुंबई महानगरात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘हर घर दस्तक’ ही मोहीम १ जून २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे, तर ३१ जुलै २०२२ पर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून घराजवळच्या कोविड लसीकरण केंद्रावर जाऊन पात्र व्यक्तींनी कोविड लस घ्यावी, यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत १८ वर्षे वयावरील सर्व पात्र नागरिकांचे पहिल्या मात्रेचे ११२ टक्के व दुसऱ्या मात्रेचे १०१ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे, तर ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १७ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे तसेच १६ मार्च २०२२ रोजीपासून १२ वर्ष ते १४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी महापालिका व शासकीय रुग्णालयात १०७, खासगी रुग्णालयात १२५ अशी एकूण २३२ कोविड-१९ लसीकरण केंद्रे कार्यन्वित आहेत. १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यांचे पहिल्या मात्रेचे २८ टक्के व दुसऱ्या मात्रेचे १२ टक्के लसीकरण झाले आहे; तर १५ ते १७ वयोगटातील लाभार्थ्यांचे पहिल्या मात्रेचे ५७ टक्के व दुसऱ्या मात्रेचे ४५ टक्के लसीकरण झालेले आहे. थोडक्यात, १८ वर्षांवरील पात्र नागरिकांच्या तुलनेत १२ ते १७ या वयोगटातील लसीकरण हे अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे.

दरम्यान कोविड संसर्गाच्या चौथ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता, कोविड लसीकरण गतिमान करण्यासाठी आणि सामाजिक प्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात १ जून, २०२२ ते ३१ जुलै २०२२ पर्यंत ‘हर घर दस्तक मोहीम २’ राबविण्यात येत आहे. यामध्ये १२ ते १४ वर्षे व १५ ते १७ वयोगटातील सर्व मुलांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासोबतच वृद्धाश्रमातील व इतर वरिष्ठ नागरिक (६० वर्ष व अधिक) यांना प्रतिबंधात्मक मात्रा (बूस्टर डोस) देण्याकरिता कार्यवाही केली जाणार आहे.

या मोहिमेत मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येत आहेत. या भेटीआधारे १२ ते १४ आणि १५ ते १७ वयोगटातील पहिली व दुसरी मात्रा न घेतलेली मुले तसेच प्रतिबंधात्मक मात्रा न घेतलेले ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत. लस घेण्यासाठी घराजवळच्या लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच विभाग पातळीवरील शाळा व महाविद्यालयात विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित शिक्षण संस्थांसोबत महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी समन्वय साधत आहेत. जेणेकरून पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण करता येईल. या मोहिमेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी म्हणून व त्याद्वारे लसीकरणाला वेग देण्यासाठी विविध समाजमाध्यमांचाही उपयोग करण्यात येत आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व पात्र नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे. त्याचप्रमाणे आपल्या पात्र पाल्यांचे देखील लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -