माधवी घारपुरे
बांद्र्याला अभिनयाच्या स्पर्धा होत्या. परीक्षक म्हणून मला आमंत्रण होते. स्पर्धा फार छान झाल्या. परीक्षकांना निर्णय देणं कठीण होतं. पण प्रथम क्रमांक मात्र निर्विवाद होता. ती होती नगरपालिकेच्या शाळेतली एक सर्वसामान्य मुलगी. जिनं संशयकल्लोळ नाटकातली कृतिका सादर केली होती. अप्रतिम अभिनय, शब्दांची फेक, भूमिकेची जाण आणि रंगमंचीय वावर. सर्व काही कसलेल्या नटीप्रमाणे. मुळातच तिला उपजत जाण असावी. त्यावर घेतलेली मेहनत म्हणजे हिऱ्याला पाडलेले पैलू. या मुलीनंतर आणखी चार स्पर्धक बाकी होते.
गंमत अशी वाटली की, कृतिकेच्या अभिनयानंतर कडकडून टाळ्या आल्या नाहीत. वाजवू की नको असा विचार करत प्रेक्षकवर्ग बसला होता. बांद्र्यासारख्या ठिकाणचे प्रेक्षक सर्व जाणकार होते. मग इतकी कंजुषी का? नगरपालिकेच्या शाळेतली मुलगी होती म्हणून की चांगल्याला चांगलं म्हटलं की आपली पत कमी होते म्हणून?
‘आषाढ घनासम खुली दाद रसिकांची’ येत नव्हती. चांगल्याला चांगलं म्हणण्याने आपले चार पैसे जातात थोडेच? मन मोठं करता येत नाही, की संवेदनाच हृदयापर्यंत पोहोचत नाहीत? यामागचं कारण कळेना. आज काल असे अनुभव येतात. जग जितकं जवळ यायला लागलं तितकी मनं आक्रसायला लागली. चार टाळ्या वाजवून ताकद तर कमी होत नाहीच, उलट रक्तप्रवाह अधिक चांगल्या प्रकारे होतो. यासाठी तरी दाद द्यावी.
खलिल जिब्रानने सहा शब्दांपासून एक शब्दापर्यंत जे ६ मंत्र सांगितले, त्यातला तिसरा चार शब्दांचा मंत्र ‘हे तू छान केलेस? हेच सांगतो की, तोंडाने चांगल्याला चांगलं म्हणा. कौतुक करा, शाबासकी द्या. थोडक्यात दाद देऊन स्वत: मोठे व्हा. समोरच्याला पण मोठं करा. समोरच्याचे कौतुक करून त्याला श्रीमंत करा. पदराला खार न लागता हसऱ्या चेहऱ्याचं दान देता येतं. कोणतेही सौंदर्य प्रसाधन वापरता चेहरा सुंदर ठेवता येतो. फक्त हसतमुख राहिल्यानं. गोड बोलण्याचा अलंकार चढवता येतो. किती क्षुल्लक असू दे, रोज एका तरी माणसाचा गुण हेरून त्याला दाद द्यायची हे पथ्य पाळा. भाषणाच्या उत्तम वाक्याला सहज टाळी येते. सुरेख तानेला वाह! आपोआप येतो; परंतु सगळ्याच बँकाचं कर्ज आपल्याच डोक्यावर असल्यागत चेहरा करून बसलेली माणसं दिसतात. खळखळून हसणंदेखील नाही हो. शिष्टाचाराच्या नावाखाली ना आमटीचा भुरका मारणार, ना उघडपणे पोट भरण्याची पावती ढेकरीने देणार.
मूळ प्रश्न परत येतो तो ‘त्या’ मुलीच्या अभिनयाला देण्याची. खरी दाद कशी असते त्याचे उदाहरण द्यावं वाटतंय. एकदा पंढरपुरात वसंतराव देशपांडे, गदिमा कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपून रात्री तिघेही बाहेर पडले. जुन्या काळातली एक गाणारी बाई बाहेर दिसली. तिला पाहून गदिमा म्हणाले, वसंतराव या मस्त बैठकीची लावणी गातात. वसंतरावांनी त्या बाईंना गाण्याचा आग्रह केला. त्यांनी पण आढे-वेढे घेता फक्कड लावणी गाईली. वसंतराव भलतेच खूश झाले आणि मिळालेली बिदागी किती त्याचा विचारही न करता त्या बाईला देऊन तिच्या गाण्याला दाद दिली. निघता निघता गदिमा नि त्या बाईंनी वसंतरावांना विनंती केली, ‘गरिबांला ऐकवाल का थोडं?’
सगळेच दर्दी! रस्त्यातच वसंतरावांनी लावणी गायली. ती बाई धुंद होऊन ऐकत राहिली. म्हणाली, मी काय दाद देणार? या बिदागीतच आणखी ११ रु. घालून रक्कम न बघताच वसंतरावांना परत केली. याला म्हणतात, कलेची दाद! हा किस्सा मी भाषणात, निकाल सांगताना सांगितला आणि सर्व हात, हातावर हात मारू लागले. डोळे हसले, ओठही विलग झाले…!